जामखेड : भूमिपुत्र आमदार प्रा. राम शिंदेंना मुस्लिम समाजातील लाडक्या बहिणींनी बांधला प्रेमाचा, आपुलकीचा, स्नेहाचा, विश्वासाचा धागा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । भाऊ आणि बहिणीच्या प्रेम आणि कर्तव्याच्या प्रतिज्ञेला समर्पित असलेल्या रक्षाबंधन सणाला भारतीय संस्कृतीत मोठे महत्व आहे. जात धर्म पंथाच्या पलिकडे जाऊन हा सण दरवर्षी साजरा केला जातो. मानवी नात्यातील प्रेमाचा, आपुलकीचा, स्नेहाचा, विश्वासाचा धागा यातून गुंफला जातो. या नात्याला फुलवण्यासाठी, जपण्यासाठी मुस्लिम समाजही मागे नाही याची प्रचिती नेकतीच जामखेडमध्ये आली.भूमिपुत्र आमदार प्रा.राम शिंदे या आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधून मुस्लिम भगिनींनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करत मतदारसंघात वेगळा सामाजिक संदेश दिला.
आमदार प्रा राम शिंदे हे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारं, त्याचबरोबर सर्वांना आपलसं आणि हवंहवेसे वाटणारे राजकीय नेतृत्व आहे. शिंदे यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासात त्यांनी कधीच कुठल्या धर्माबाबत भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन आजवरचा प्रवास केलेला आहे. म्हणूनच मुस्लिम समाजातही त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. मुस्लिम समाजातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे.आजवर त्यांनी अनेक विकास कामांना भरीव निधी दिलेला आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्वच समाज घटकांना हक्काने आपला वाटणारा, आपल्या घरातीलच सदस्य वाटणारा हा गोरगरिबांचा लोकनेता अशी मतदारसंघाची जनभावना आहे. त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा जामखेडमध्ये पार पडलेल्या रक्षाबंधन सोहळ्यात दिसून आली.
जामखेड शहरातील विठाई लाॅन्स येथे आमदार प्रा राम शिंदे व महायुतीच्या वतीने रक्षाबंधन सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो माता भगिनींनी लाडक्या रामभाऊला राख्या बांधत हा सोहळा साजरा केला. रक्षाबंधन सोहळ्यास जामखेड शहरातील महिला भगिनींनी तुफान प्रतिसाद दिला.
यावेळी शहरातील शेकडो मुस्लिम भगिनींनी आमदार प्रा राम शिंदे यांना राखी बांधत आमचा रक्षक भूमिपुत्र असलेला रामभाऊच आहे हाच संदेश यातून दिला.रक्षाबंधन सोहळ्यात शहरातील भगिनींनी दाखवलेल्या उत्स्फूर्त प्रेमामुळे आमदार प्रा राम शिंदे हे भारावून गेले होते.जामखेड मधील सर्वधर्मीय लाडक्या बहिणी आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठीशी एकवटल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.