जळगावमध्ये SBI बँकेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा! बडतर्फ PSI निघाला मास्टरमाइंड; २७ किलो सोने, १५ लाखांची रोकड लंपास, चारही दरोडेखोर काही तासांत जेरबंद!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : वेळ दुपारची… बँकेत नेहमीप्रमाणे कामकाज सुरू… अचानक चार दरोडेखोर बँकेत घुसले… शस्त्रांचा धाक दाखवत तब्बल ४५ मिनिटे धुमाकूळ घातला… आणि २७ किलो सोने अन् १५ लाखांची रोकड घेऊन पसार झाले! ही एखाद्या चित्रपटातील थरारक कथा नाही, तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात घडलेली सत्य घटना आहे!

जळगाव तालुक्यातील भोकर येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत शनिवारी भरदिवसा दरोडेखोरांनी अक्षरशः दहशत माजवली. कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली तसेच यावेळी बंदुकीतून गोळीबारही करण्यात आला. सुदैवाने गोळी चुकल्याने मोठा अनर्थ टळला. दरोडेखोरांनी तब्बल ४० ते ४५ मिनिटे बँकेत धुमाकूळ घातला आणि सुमारे ३० कोटी रुपयांचे सोने आणि १५ लाख रुपयांची रोकड लंपास करत पलायन केले.या सशस्त्र दरोड्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. मात्र, ग्रामस्थांचा पाठलाग, पोलीस पाटलांची सतर्कता आणि पोलिसांची वेगवान कारवाई यामुळे दरोडेखोरांचा डाव उधळला गेला. अवघ्या काही तासांत चारही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण दरोड्याचा मास्टरमाइंड चक्क बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक असल्याचे तपासात समोर आले आहे.
कारागृहात कट; जामिनावर बाहेर येताच बँकेवर दरोडा !
या दरोड्यामागील सूत्रधार शंकर जासक याचा गुन्हेगारी इतिहासही तितकाच धक्कादायक आहे. २०२३ मध्ये जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टेट बँकेत त्याने आपल्या शालकाच्या मदतीने तब्बल ३ कोटी १७ लाख रुपयांचा दरोडा टाकला होता. या गुन्ह्यात तो जळगाव मध्यवर्ती कारागृहात असताना त्याची ओळख चाळीसगाव येथील खून प्रकरणातील आरोपी गजानन राजेंद्र पवार याच्याशी झाली.
दोघांनी कारागृहात असतानाच बँक लुटण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर दोघेही जामिनावर बाहेर आले आणि आणखी दोन साथीदारांना सोबत घेत त्यांनी दरोड्याची योजना प्रत्यक्षात आणली.
कर्मचाऱ्यांना मारहाण, डोक्याला पिस्तूल; १६ लॉकर फोडून सोन्याच्या बॅगा भरल्या!
शनिवारी दुपारी बँकेत ग्राहकांची वर्दळ कमी असल्याची संधी साधून आरोपी दुचाकीवरून भोकर येथील SBI शाखेत दाखल झाले. आत शिरताच छऱ्याच्या पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांनी कर्मचाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली.
विरोध करणाऱ्या बँक व्यवस्थापक आणि कॅशियरला बेदम मारहाण करण्यात आली. दोघांना खुर्चीला बांधून त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावण्यात आले. त्यानंतर तिजोरीच्या चाव्या हिसकावून घेत आरोपींनी तब्बल १६ लॉकर फोडले. त्यातून अंदाजे २७ किलो सोने आणि १५ लाख रुपयांची रोकड पाच ते सहा बॅगांमध्ये भरली. सुमारे ४० ते ४५ मिनिटे बँकेत दहशत माजवल्यानंतर आरोपी मुद्देमालासह पसार झाले.
ग्रामस्थांचा पाठलाग ; पोलिसांचा शेताला वेढा!
दरोडेखोर पसार होताच भोकर आणि परिसरातील ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. पोलीस पाटलांनी क्षणाचाही विलंब न करता तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांना घटनेची आणि आरोपींच्या दिशेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने डिक्साई परिसरात नाकाबंदी केली. या कारवाईत दोन आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात आले.
दरम्यान, उर्वरित दोघे धरणगावच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांना सतर्क करण्यात आले. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच आरोपींनी चावलखेड्याजवळ रस्त्याच्या कडेला सोन्याच्या चार बॅगा फेकून दिल्या आणि जवळच्या शेतात धाव घेतली.
मात्र, पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने संपूर्ण शेताला वेढा घातला. अखेर बडतर्फ PSI शंकर जासक आणि गजानन पवार या दोघांनाही शेतातून ताब्यात घेण्यात आले. अशा प्रकारे दरोड्यातील चारही आरोपी काही तासांतच पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव; २७ किलो सोने आणि रोकड हस्तगत
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी शशिकांत पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी आरोपींकडून सुमारे २७ किलो सोन्याच्या बॅगा आणि १५ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची अधिकृत मोजदाद आणि पडताळणी सुरू आहे.
भरदिवसा बँकेत घुसून कोट्यवधींचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला काही तासांतच जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, या संपूर्ण दरोड्याचा सूत्रधार एकेकाळचा पोलीस अधिकारी असल्याचा धक्कादायक खुलासा या प्रकरणाला वेगळेच वळण देणारा ठरला आहे. ग्रामस्थांची सतर्कता आणि पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे दरोड्याचा थरारक अध्याय काही तासांतच संपुष्टात आला.
या गुन्ह्यात आणखी काही संशयित सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अटक केलेल्या चारही आरोपींची कसून चौकशी सुरू असून, दरोड्याचे नियोजन कोणी केले, बँकेची पूर्वी रेकी करण्यात आली होती का, आरोपींना बँकेतील सोन्याच्या साठ्याची माहिती कशी मिळाली आणि या गुन्ह्यामागे आणखी कोणाचा हात आहे, याचा तपास केला जात आहे.फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.