अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! राम शिंदेंचे समर्थक अजिनाथ हजारेंचे मतदारांना आवाहन; म्हणाले, ‘माझ्या चिन्हावर मतदान करू नका’
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख :अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानापूर्वी मोठी घडामोड समोर आली आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे विश्वासू सहकारी अजिनाथ हजारे यांनी ‘मला मतदान करू नका’ असे आवाहन मतदारांना केले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर आवाहन जारी केले आहे. हजारे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रा. राम शिंदे यांनी अजिनाथ हजारे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. त्यानुसार हजारेंनी ओबीसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, तांत्रिक कारणांमुळे त्यांना विहित मुदतीत अर्ज मागे घेता आला नाही. परिणामी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अंतिम उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव कायम राहिले.

सोशल मीडियावर पत्रक; मतदारांना स्पष्ट संदेश
अजिनाथ हजारे यांनी सोशल मीडियावर पत्रक प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत मी ओबीसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु तांत्रिक कारणास्तव मला हा अर्ज वेळेत मागे घेता आला नाही, त्यामुळे तो निवडणूक रिंगणात कायम राहिला आहे. माझी सर्व मतदार बंधू-भगिनींना नम्र विनंती आहे की, माझ्या नावासमोरील चिन्हावर कोणीही मतदान करू नये, सर्वांनी सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
उमेदवारी कायम, पण मतदान न करण्याचे आवाहन!
उमेदवारी अर्ज अंतिम यादीत कायम असताना उमेदवारानेच मतदारांना आपल्या चिन्हावर मतदान न करण्याची विनंती केल्याने या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हजारेंनी अधिकृत उमेदवारी मागे घेतल्याची घोषणा केलेली नसून, मतदारांनी आपल्या नावासमोरील चिन्हावर मतदान करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
जामखेड तालुक्यातील जवळा गावचे रहिवासी असलेले अजिनाथ हजारे हे भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीत सक्रिय आहेत. प्रा. राम शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेमागील राजकीय संदर्भाबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
११ जागा बिनविरोध; १० जागांसाठी निवडणूक
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकूण २१ जागांपैकी ११ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १० जागांसाठी निवडणूक होत आहे. २ नोव्हेंबर रोजी मतदान, तर ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीतील राजकीय समीकरणे आणि विजयाची गणिते उमेदवारांकडून जुळवली जात असतानाच अजिनाथ हजारे यांनी मतदानाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे.