जामखेड टाइम्स वृत्तसेवा : घरगुती वाद विकोपाला गेल्याने पोलिस शिपायाने टोकाचे पाऊल उचलले. स्वता:वर गोळी झाडून घेत जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून समोर आली आहे. (Dayanand Krishna Patil)

नागरदळे (ता. चंदगड) येथे पोलिस शिपाई दयानंद कृष्णा पाटील (वय ४२) यांनी कौटुंबिक वादातून घरी डबल बार बंदुकीतून तोंडाजवळ गोळी झाडून घेत आत्महत्या (Maharashtra Police Constable Dies in Chandgad) केली.हा प्रकार मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : दयानंद पाटील हे लष्करी सेवेतून १७ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले होते. सध्या ते मीरा-भाईंदर येथे वाहतूक शाखेत पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांना मुलगा व मुलगी आहे. ते कुटुंबासह तेथे राहत होते. गेल्या काही दिवसांपासून पत्नी व त्यांच्यात वाद होता. त्यातून त्यांनी आठ दिवसांपूर्वी पत्नी व मुलांना सासुरवाडीला पाठविले होते.
काल सकाळी ते मुंबईवरून गावी आले. घरगुती वादाबाबत दुपारी पंचांसमवेत गावाबाहेरील शेतात बैठक झाली. बैठकीला सासुरवाडीचे लोकही होते. त्यात वाद मिटविण्यात यश आले. बैठक झाल्यानंतर दयानंद यांनी गाडीतील बंदूक काढून हवेत दोनवेळा गोळीबार केला. त्यावेळी उपस्थितांनी त्यांना जाब विचारला असता आनंदाच्या भरात गोळीबार केल्याचे त्यांनी सांगितल्याची चर्चा घटनास्थळावर होती.
त्यानंतर ते घरी आले. हवेत गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळताच चंदगड पोलिसांनी पोलिस पाटील यांच्या माध्यमांतून त्याची माहिती मागितली. याबाबत पोलिस पाटलाने पाटील यांना पोलिसांनी गोळीबाराची माहिती मागितल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी सरावासाठी गोळीबार केल्याचे सांगितले.
दरम्यान, थोड्याच वेळाने त्यांनी घरातील आतील खोलीत जाऊन दरवाजा बंद केला व स्वतःवर गोळीबार करून घेतला. घरात खुर्चीवर बसून फार जवळून स्वतःवर गोळी झाडली. त्यामुळे डोके व चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. गोळी झाडल्यानंतर अतिप्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे, असे मिडीया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी वडील कृष्णा पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले, निरीक्षक एन. आर. चौखंडे, उपनिरीक्षक आकाश भिंगारदिवे घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास चंदगड पोलिस करत आहेत.