Good News: जामखेड तालुक्यात कोरोना मंदावला ; पण धोका कायम !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  जामखेड तालुक्यात गेल्या महिनाभरापासुन सुरू असलेला कोरोनाचा उद्रेक आज अचानक थंडावल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे जामखेड तालुक्यातील जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र तालुक्यावर कोरोनाचा धोका मात्र अजुनही कायम आहे. काल 28 रोजी तालुक्यात कोरोनाने 249 रूग्णांची विक्रमी उसळी मारली होती मात्र आज 29 रोजी कोरोना थंडावल्याचे चित्र समोर आले आहे. आज दिवसभरात जामखेड तालुक्यात फक्त 06 नवे रूग्ण आढळून आले आहेत तर 57 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय वाघ यांनी सायंकाळी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

जामखेड तालुका आरोग्य विभागाने आज दिवसभरात फक्त 34 नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या. प्रशासनाने चाचण्या कमी केल्याचे आज दिसुन आले. रॅपिड अँटीजेन चाचण्यांसाठी आवश्यक असलेल्या किटचा जिल्हा प्रशासनाकडे तुटवडा झाल्याने रॅपिड अँटीजेन चाचण्या कमी होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आज आढळून आलेल्या नव्या कोरोनाबाधितांमध्ये जामखेड शहर 05 व धोत्री 01 असे रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान दिवसभरात प्रशासनाने 263 नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय वाघ यांनी दिली आहे.

एकिकडे संपुर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे. यात जामखेड तालुकाही सुटलेला नाही. जामखेड तालुक्यात सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या काही हजारात आहे. शहरात बेड मिळणे मुश्किल झाले आहे. नागरिकांनी  कोरोनाचे लक्षणे अंगावर न काढता तातडीने कोरोना तपासणी करून योग्य उपचार घ्यावेत, विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नये, नियमित मास्कचा वापर करावा असे अवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.