पश्चिम महाराष्ट्रात महाप्रलय : बाप रे ! ६४१ गावांना बसलाय पुराचा तडाखा: ९० हजार नागरिकांचे स्थलांतर, 

२०१९ च्या विनाशकारी महापुराच्या आठवणी पुन्हा जिवंत

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : महापुरात अडकलेली माणसं जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत. काही माणसं उपाशी राहून पुराच्या संकटाशी दोन हात करत आहे. कोपलेल्या निसर्गाने माणसांच्या आयुष्याची पुरती दाणादाण उडवून टाकली आहे. पश्चिम महाराष्ट्रात आश्रुंचा महापुर ओसांडून वाहतोय. सातारा व कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यातील तब्बल ६४१ गावांना पुराचा तडाखा आहे. या भागातील मोठ्या नद्या अजुनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. महापुराचा धोका कायम आहे.पश्चिम महाराष्ट्रात महाप्रलय आला आहे अशी स्थिती आहे.

मागील चार दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने रौद्र रूप धारण करत पुरती दाणादाण उडवून दिली आहे. अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार माजवत सन २०१९ च्या विनाशकारी महापुराच्या आठवणी पुन्हा जिवंत केल्या आहेत. सांगली सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती अतिगंभीर बनली आहे.

कोल्हापूरात शनिवारी पावसाने उसंत घेतली असली तरी पुर असुनही ओसरलेला नाही. सांगली सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांना महापुराचा मोठा तडाखा बसला आहे. सर्व प्रमुख महामार्ग व छोटे मार्ग पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेक भागातील वाहतुक ठप्प आहे. गावची गावं पाण्याच्या वेढ्यात अडकून पडली आहेत. यामुळे अनेक गावांचा जगाशी संपर्क तुटला आहे. शेतीसह अन्य मालमत्तेचं करोडो रूपयांची हानी या भागात झाली आहे.पश्चिम महाराष्ट्रात महाप्रलय आल्यासारखी परिस्थिती आहे.

पश्चिम महाराष्ट्रात महाप्रलय
पश्चिम महाराष्ट्रात महाप्रलय

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठा तडाखा दिला आहे. अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये जिल्ह्यातील ३७९ गावे बाधित झाली असून १८ जणांचा मृत्यू, २४ जण बेपत्ता, ०३ हजार २४ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण ०१ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. बचाव कार्यासाठी एनडीआरएफ तीन टीम सातारा जिल्ह्यात कार्यरत असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील एकूण १६७ गावे पुर्णत: २१२ गावे अंशत: अशी एकूण ३७९ गावे बाधित झाली आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील ४४ गावे पुर्णत: व ०७ गावे अंशत: अशी एकूण ५१ गावे बाधित झाली आहेत. कराड तालुक्यातील एकूण ३० गावे अंशत: बाधित झालेली आहेत. पाटण तालुक्यातील १० गावे पुर्णत: व ६० गावे अंशत: अशी एकूण ७०  गावे बाधित झाले आहेत.महाबळेश्वर तालुक्यातील ११३ गावे पुर्णत: बाधित तर सातारा तालुक्यातील १३ गावे अंशत: बाधित आहेत. तसेच जावली तालुक्यातील १०२ गावे अंशत: बाधित झाली आहेत.

साताऱ्यात १८ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण बेपत्ता आहेत तर ०३ हजार २४ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वाई तालुक्यात ०३ मृत्यू, ०२ जण बेपत्ता व २० पशुधन मृत्यू, कराड तालुक्यात ०३ हजार पशुधन मृत्यू (कोंबडी), पाटण तालुक्यात १२ मृत्यू व २० जण बेपत्ता, महाबळेश्वर तालुक्यात ०१ मृत्यू व ०२ पशुधन मृत्यू, सातारा तालुक्यात ०२ पशुधन मृत्यू, जावली तालुक्यात ०२ मृत्यू व ०२ जण बेपत्ता झाले आहेत.

साताऱ्यातील वाई, कराड पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील एकूण ०१ हजार ३२४ कुटुंबातील ०५ हजार ६५६ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये वाई तालुक्यातील ७२ कुटुंबातील ३९० जण, कराड तालुक्यातील ८७६ कुटुंबातील ०३ हजार ८३६ जण, पाटण तालुक्यातील ३२५ कुटुंबातील ०१ हजार ३०० जण, महाबळेश्वर तालुक्यातील ५१ कुटुंबातील १३० जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात महाप्रलय
पश्चिम महाराष्ट्रात महाप्रलय

कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती भीषण आहे. २०१९ ला या जिल्ह्यात महापुराने मोठा विध्वंस घडवला होता. गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. तीन दिवसांत पडलेल्या अतिवृष्टीमुळे २६२ गावे पूरबाधित बनली आहेत. त्यामध्ये ३४ गावे पूर्णत: तर २२८ गावे अंशत: बाधित आहेत. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ९९१७ कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहेत. पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर शहरात पाणी घुसले आहे. शहरात अनेक ठिकाणी पुराचे पाणी घुसले.

प्रशासनाने ४० हजार ८८२ माणसे स्थलांतरित केली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीच्या कालावधीत पाच व्यक्ती मयत झाल्या आहेत. राधानगरी व चंदगड तालुक्‍यातील प्रत्येकी दोन तर कागलमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या तीन टीम कार्यरत आहेत. यापैकी शिरोळ तालुक्‍यात एक व करवीर तालुक्‍यात दोन टीम सक्रिय आहेत. त्यांना स्थानिक प्रशासनाची साथ आहे. शिवाय सेवाभावी संस्था आणि सार्वजनिक तरुण मंडळाच्या कार्यकर्तेही मदत कार्यात आहेत. स्थलांतरित जनावरांची संख्या १५ हजार २९६ आहे. शेती, व्यापार व पशुधनाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

\पावसामुळे १० राज्यमार्गांची वाहतूक खंडीत झोली आहे. प्रमुख जिल्हा मार्ग २९, इतर जिल्हा मार्ग १० आणि ग्रामीण मार्ग १८ खंडीत झाले आहे. जिल्ह्यातील स्थलांरित लोकांसाठी निवारागृहे सुरू केली आहेत. तहसिलदार व दानशूर व्यक्ती, संस्था, कारखाना व्यवस्थापन यांनी पूरबाधित लोकांसाठी निवारागृहाची व्यवस्था केली आहे.

कोल्हापूर महापालिकेतर्फे शहरातील १०१९ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.यामध्ये रामानंदनगर येथील ४० लोक, शुक्रवारपेठ, पंचगंगा तालीम परिसर, सिध्दर्थनगर या परिसरातील ७४ कुटुंबांतील ३१२ नागरिकांचा समावेश आहे.तर शाहुपूरी कुंभार गल्ली, सुतारवाडा, रिलायन्स मॉल जवळील ६८ कुटुंबातील २५५ जणांचे स्थलांतर केले आहे. न्यू पॅलेस, रमणमळा परिसर, रेणुका मंदिर, त्रिंबोली नगर, सनसिटी, महावीर कॉलेज पिछाडी, पोलो ग्राऊंड, जावडेकर अपा. ड्रिम वर्ल्ड, मुक्त सैनिक वसाहत येथील १३५ कुटुंबातील ३२० नागरिकांचे स्थलांतर केले आहे. शाळा, कॉलेज, समाजमंदिर, होस्टेल येथे व्यवस्था केली आहे.

सांगली पूर : विविध क्षेत्रातील स्थलांतरीत

  • मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्रातील २३४ कुटुंबामधील १ हजार ००६ लोकांचे स्थलांतर.
  • मिरज ग्रामीण क्षेत्रातील ३०७ कुटुंबातील २ हजार २०७ लोकांचे स्थलांतर.
  • अपर सांगली ग्रामीण मधील १ हजार ४२४ कुटुंबातील ५ हजार ७४९ लोकांचे स्थलांतर.
  • वाळवा तालुक्यातील वाळवा क्षेत्रातील २ हजार ४५२ कुटुंबातील १४ हजार ७२५ लोकांचे स्थलांतर.
  • अपर आष्टा क्षेत्रातील ४२४ कुटुंबातील २ हजार १३५ लोकांचे स्थलांतर.
  • शिराळा तालुक्यातील ३९४ कुटुंबातील १ हजार ८४२ लोकांचे स्थलांतर.
  • पलूस तालुक्यातील २ हजार ४३६ कुटुंबातील ९ हजार ३२३ लोकांचे स्थलांतर.

पूरग्रस्त भागातून ९० हजार माणसे स्थलांतरित

राज्यातील सांगली, कोल्हापूर सातारा, पुुणे, रत्नागिरी आणि रायगडचा तसेच ठाणे या सात जिल्ह्यांना पुराचा मोठा तडाखा बसला आहे. सांगली जिल्ह्यात ४२  हजार ५७३, सातारा जिल्ह्यातील ०५ हजार ६५६ जणांना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ४० हजार ८८२ जणांना हलवण्यात आले आहे. एकूण ९० हजार १११ नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले असून १०० पेक्षा अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत. तसेच राज्यात दरड कोसळून आणि मुसळधार अतिवृष्टीने बळी गेलेल्यांची संख्य १५० च्या वर पोहचली आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नद्या धोक्‍याच्या पातळीवरून वहात आहेत. अजुनही या भागातील महापुराचा धोका टळलेला नाही. पावसाने जोर धरल्यास परिस्थिती अतिशय भीषण होऊ शकते.