जामखेड टाईम्स वृत्तसेवा: सोलापुर जिल्ह्यातील करमाळा येथील प्रसिद्ध शहा (जवळेकर ) हाॅस्पिटमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन न करता कोरोनावर चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात येत असल्यामुळे या हाॅस्पीटलमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे मृत्यू होत आहेत. या मृत्यूंचे ऑडीट होऊन सदर सेंटर व डाॅक्टरांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार मानवी हक्क कार्यकर्ते ॲड. विकास शिंदे यांनी सोलापुरच्या जिल्हाधिका-यांकडे केली आहे. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी सोलापुर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाकडे तक्रार पाठवली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शिंदे यांना देण्यात आली आहे अशी माहिती ॲड. विकास शिंदे यांनी आज जामखेड टाईम्सशी बोलताना दिली आहे.यामुळे आता करमाळा येथील वैद्यकीय व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
मानवाधिकार कार्यकर्ते ॲड. विकास शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कोरोना रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार करण्यात यावेत याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जागतिक आरोग्य संघटना तसेच भारतीय वैद्यकीय परिषद यांनी देशातील सर्व डॉक्टरांना दिलेल्या आहेत. त्यानुसारच कोरोना पेशंट वरती उपचार होणे अपेक्षित आहे. मात्र करमाळा शहरात परवानगी देण्यात आलेल्या जवळेकर हॉस्पिटलच्या कोरोना सेंटरमध्ये या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नाही.मनमानी व चुकीच्या पद्धतीने रुग्णांवरती उपचार केले जात असल्यामुळे अनेक रुग्णांचे जीव जात आहेत. या भागातील इतर रुग्णालयांपेक्षा या रुग्णालयाचा मृत्यू दर खुप जास्त आहे. त्याचे कारण चुकीच्या पद्धतीने उपचार, गरज नसताना रेमिडीसीवरचा भडीमार हे आहे.
90 पर्यंत ऑक्सिजन लेवल असलेल्या रुग्णाला रेमेडीसिवर इंजेक्शन देण्याची आवश्यकता नसतानाही पाच ते सहा इंजेक्शन दिली जात आहेत. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्ण बरा होण्यापेक्षा इंजेक्शनचे रुग्णांवर होणारे घातक परिणाम जास्त भयंकर आहेत. अगदी कमी प्रमाणात त्रास असणाऱ्या पेशंटला जीव गमवावे लागले आहेत.
त्यामुळे जवळेकर हॉस्पिटलच्या कोविंड केअरची तातडीने तपासणी करण्यात यावी तसेच तेथे झालेल्या मृत्यूंचे ऑडिट करून संबंधित हॉस्पिटल वरती कडक कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली होती. तक्रारीची योग्य दखल न घेतल्यास लोकांचे जीव वाचविण्यासाठी जनहितार्थ उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही ॲड. शिंदे यांनी दिला आहे.
कोरोनावरील चुकिच्या उपचारांमुळे व स्टेराॅईडच्या अतिरिक्त वापरामुळे म्युकरमायकोसीस (बुरशीजन्य) सारख्या रोगाचे रुग्ण राज्यात वाढताना दिसत आहेत. दुर्दैवाने जवळेकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीसची लक्षणे आढळून येत असल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे.अशा परिस्थितीत जिल्हा आरोग्य अधिका-यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता नि:पक्षपातीपणे चौकशी करावी. तसेच या हाॅस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या अन्यायग्रस्त लोकांनी ९६०४५३६०६० या क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन ॲड. शिंदे यांनी केले आहे.