महाराष्ट्रात करोनाचा उद्रेक कायम : राज्यात झाले 52 हजार 422 सक्रीय कोरोनाबाधित, महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर राज्याची वाटचाल होऊ लागली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून 12 हजाराच्या आसपास कोरोना रूग्ण सापडू लागले आहेत. राज्यातील सक्रीय कोरोनाबाधितांचा आकडा धडकी भरवणारा आहे. राज्यात सोमवार अखेर सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 52 हजार 422 झाली आहे.

राज्यात कोरोनाचा उद्रेक थांबायचे नाव घेत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात एकुण 12 हजार 160 नव्या रूग्णांची भर पडली आहे. कोरोनाची वाढती रूग्ण संख्या पाहता निर्बंध अधिक कठोर करण्याचे संकेत सरकारकडून दिले जात आहेत.

लाॅकडाऊन लागणार का ? असा प्रश्न विचारला जात असला तरी सरकारकडून सध्यातरी तसा विचार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वक्तव्य केले आहे. परंतू कोरोना नियमांचे पालन न झाल्यास राज्याची परिस्थिती बिघडण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता नियमांचे पालन करणे आवश्यक आहे असे सातत्याने आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.

राज्यात सोमवारी दिवसभरात एकुण 1 हजार 748 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच आज 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यातील सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 52 हजार 422 इतकी झाली आहे. हा आकडा चिंताजनक आहे. रोज रूग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने राज्य तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आले असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

जगाची झोप उडवून देणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रूग्णांमध्ये राज्यात वाढ सुरू आहे.  राज्यात आज ओमिक्रॉनचे 68 नवे रूग्ण आढळून आले. यामध्ये मुंबई 40, पुणे मनपा 14, नागपुर 4,  पुणे ग्रामीण 3, पनवेल 3, कोल्हापूर 1, नवी मुंबई 1, रायगड 1, सातारा 1 या रूग्णांचा समावेश आहे. राज्यातील ओमिक्रॉन रूग्णांची संख्या आता 578 इतकी झाली आहे. यातील 259 रूग्णांचे RTPCR नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात सक्रीय ओमिक्रॉन रूग्णांची संख्या  319 इतकी आहे.

राज्यातील सर्वाधिक रूग्ण एकट्या मुंबई शहरात आहेत. मुंबईतील सक्रीय रूग्णांची संख्या 37 हजार 274 इतकी आहे . त्यापाठोपाठ ठाण्याची रुग्ण संख्या 6 हजार 309 आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील रूग्णसंख्या 346 इतकी झाली आहे.

राज्यात सोमवार अखेर 3 लाख 32 हजार 610 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये आहेत तर 1096 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.05 टक्के आहे. तर मृत्यूदर 2.1 टक्के आहे अशी माहिती राज्य आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आली आहे.