BJP Shirdi Adhiveshan 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कधी होणार ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे शिर्डी भाजप अधिवेशनात मोठे वक्तव्य
शिर्डी, १२ जानेवारी २०२५ : BJP Shirdi Adhiveshan 2025 : विधानसभा निवडणुकीत महायुतीने जसा महाविजय मिळवला तसाच महाविजय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला मिळवायचा आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. येत्या तीन ते चार महिन्यांत या निवडणूका होणार आहेत, याची जोमाने तयारी करा, सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी येथे महाराष्ट्र भाजपाकडून आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनातून अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

यावेळी पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, जनतेने महायुतीला जो महाविजय मिळवून दिला आहे त्या विजयाचा सन्मान राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे.सरकारच्या योजनांबाबत विरोधकांकडून चुकीचा नेरेटिव्ह पसरवला जात आहे. परंतू समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या सुरू राहणार आहेत. विरोधकांकडून जनतेची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न होत आहे, तो हाणून पाडण्यासाठी काम करा. संघटनेला सरकार सोबत काम करावं लागेल. आपल्या पक्षाची संस्कृती इतर पक्षांपेक्षा वेगळी आहे याचं भान सर्वांनी ठेवावं, विनाकारण मंत्रालयात चकरा मारू नका, समाजाच्या हिताची कामं घेऊन या, असं देखील यावेळी फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, विकासाची कामं करायची आहेत, सगळ्या समाजाला घेवून आपल्याला पुढे जायचं आहे, 25-15 सामान्य लोकांच्या जीवनातील दु:ख दूर करण्याचं साधन आहे. ही योजना कोण्या एकाला मलिदा लाटण्यासाठी नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावं, भारतीय जनता पक्षाची संस्कृती आपण सर्वांनी लक्षात ठेवावं असं आवाहन फडणवीसांनी केलंय. येत्या काळात भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याकरिता एक पारदर्शी चालणार सरकार आणि त्यामागे हिमालयासारखी उभी असणारी संघटना अशी प्रतिमा करायची आहे, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
