धक्कादायक : राज्यात कोरोनाचा विस्फोट, धडकी भरवणारा आकडा आला समोर, महाराष्ट्रात बुधवारी आढळले 26 हजार 538 नवे कोरोना रुग्ण !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 5 जानेवारी ।  राज्यात बुधवारी कोरोनाचा मोठा विस्फोट झाला आहे. राज्यात सुरू असलेल्या कोरोना उद्रेकामुळे मोठ्या शहरातील शाळा यापुर्वीच बंद झाल्या आहेत. आता राज्यातील महाविद्यालये बंदचीही घोषणा बुधवारी करण्यात आली. राज्यातील सक्रीय रूग्णांचा आकडा आता लाखाच्या घरात जाऊन पोहचला आहे. (Corona blast, shocking Wednesday’s figures, 26000 new patients found in Maharashtra on Wednesday)

राज्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढू लागला आहे. राज्यात बुधवारी कोरोनाचा अक्षरशः महाउद्रेक झाला आहे. तब्बल 26 हजाराहून अधिक रूग्ण राज्यात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात अधिक कठोर निर्बंध लावण्यासाठी सरकार पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्यात बुधवारी दिवसभरात एकुण 26 हजार 538 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर 5331 कोरोनाबाधित रूग्णबरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 08 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 87 हजार 505  इतकी झाली आहे. सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या लाखाच्या घरात गेल्याने राज्याच्या चिंता वाढल्या आहेत.

राज्यात बुधवारी 25 हजाराहून अधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने राज्यात तिसरी लाट आल्याचे जवळपास निश्चित आहे परंतू याबाबत आरोग्य विभागाकडून अद्याप कुठलाही दुजोरा दिला गेलेला नाही. राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जनतेने आता अधिक सतर्क आणि सावध होणे आवश्यक आहे. कोरोना नियमांचे पालन करून दैनंदिन व्यवहार करावेत असे अवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रूग्णांमध्येही राज्यात वाढ सुरू आहे. राज्यात आज ओमिक्रॉनने शतक ठोकले.  राज्यात ओमिक्रॉनचे 144 नवे रूग्ण आढळून आले. राज्यात बुधवारी ओमिक्रॉनने जणू कलम 144 लावले आहे.

राज्यात आढळून आलेल्या नव्या ओमिक्रॉन रूग्णांमध्ये मुंबई 100, नागपुर 11, पुणे मनपा 07, ठाणे मनपा 07, पिंपरी-चिंचवड 6, कोल्हापूर 5, आणि अमरावती, उल्हासनगर,  भिवंडी-निजामपूर मनपा या ठिकाणी प्रत्येकी 2 तर पनवेल आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला आहे.

राज्यात बुधवार अखेर 797 ओमिक्रॉन रूग्ण आढळून आले आहेत. यातील 330 रूग्णांचे RTPCR अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. राज्यातील सक्रीय ओमिक्रॉन रूग्णांची संख्या आता 467 इतकी झाली आहे.

राज्यातील सर्वाधिक कोरोना रूग्ण एकट्या मुंबई शहरात आहेत. मुंबईतील सक्रीय रूग्णांची संख्या 61 हजार 923 इतकी आहे. मुंबईत तिसरी लाट सुरू झाल्याचेच यावरून स्पष्ट होत आहे. मुंबई पाठोपाठ ठाण्याची रुग्ण संख्या 11 हजार 262  आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील रूग्णसंख्या 433 इतकी झाली आहे.

राज्यात बुधवार अखेर 05 लाख 13 हजार 758 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये आहेत तर 1366 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.55 टक्के आहे. तर मृत्यूदर 2.9 टक्के आहे अशी माहिती राज्य आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आली आहे.