विसर्जन मिरवणुकीतून मित्राच्या घरी आला, झोपला अन् उठलाच नाही! पुण्यातील तरुणाचा जामखेडमध्ये दुर्दैवी मृत्यू

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : गणेशोत्सवाचा आनंद क्षणात दुःखात बदलल्याची मोठी घटना जामखेड शहरातून समोर आली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीतून मित्राच्या घरी झोपायला गेलेल्या तरूणाचा झोपेतच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अनिकेत बेंजामिन निमगावकर असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना म्हाडा काॅलनीत घडली आहे.

Aniket Benjamin Nimgaonkar passed away in his sleep, police investigation underway,

याबाबत सविस्तर असे की, अनिकेत बेंजामिन निमगावकर हा २९ वर्षीय तरूण गणेशोत्सवासाठी जामखेडला आला होता. २५ रोजी गणेश विसर्जन मिरवणूक संपवून तो म्हाडा काॅलनीतील आपल्या मित्राच्या घरी झोपण्यासाठी गेला होता. तो एका खोलीत तर मित्र दुसर्‍या खोलीत झोपले होते.दुसऱ्या दिवशी (२६ रोजी) सकाळी साडेदहाच्या सुमारास मित्राने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कोणताच प्रतिसाद देत नव्हता. तो मृतावस्थेत आढळून आला.

या प्रकरणी सुरेश निमगावकर यांच्या खबरीवरून जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, जामखेड पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, मयत अनिकेत हा पुर्वी जामखेडमध्ये वास्तव्यास होता. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तो नोकरीनिमित्त पुण्याला स्थायिक झाला होता. तो वडगाव शेरी या परिसरात राहण्यास होता. गणेशोत्सवासाठी तो मित्राकडे जामखेडला आला होता. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. झोपेतच अनिकेतला मृत्यूने गाठले. अनिकेतचा मृत्यूचे नेमके कारण काय? म्हाडा काॅलनीत नेमकं काय घडलं? अनिकेतचा मृत्यू नैसर्गिक की वेगळेच कारण? या प्रश्नांचा उलगडा जामखेड पोलिस कधी करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.