Vaishnavi Jarande : आयटीमध्ये नोकरी, ४५ लाखांचा हुंडा, १० तोळे सोने… तरीही ५ लाखांसाठी भयानक छळ; पुण्यात आणखी एका वैष्णवीचा बळी!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : वर्षभरापूर्वी पुण्यात घडलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. ती घटना ताजी असतानाच, आता पुण्यात आणखी एका वैष्णवीचा बळी गेलाय. चारचाकी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, यासाठी २३ वर्षीय आयटी इंजिनिअर विवाहितेचा पती, सासू आणि सासऱ्यांकडून मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. अखेर या जाचाला कंटाळून तिने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Vaishnavi Jarande Case Pune, latest news)

Vaishnavi Jarande Case Pune, latest news,

वैष्णवी प्रवीण जरांडे (वय २३) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून काळेपडळ पोलीस ठाण्यात पती ओंकार संजय घिसरे याच्यासह सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नात ४५ लाख खर्च, १० तोळे सोने; तरीही ५ लाखांसाठी तगादा

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीचा विवाह ९ मे २०२६ रोजी ओंकार संजय घिसरे याच्याशी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. मुलीच्या सुखासाठी माहेरच्यांनी लग्नात तब्बल ४५ लाख रुपये खर्च केले होते, तसेच १० तोळे सोनेही हुंडा म्हणून दिले होते. मात्र, एवढे सगळे देऊनही सासरच्या मंडळींची हाव संपली नव्हती. लग्नाला अवघा महिना उलटत नाही तोच, १० जून रोजी पती ओंकारने वैष्णवीच्या वडिलांना फोन केला आणि ‘मला चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये द्या किंवा गाडी घेऊन द्या’, अशी थेट मागणी केली.

वर्क फ्रॉम होम आणि सासरचा सततचा जाच

वैष्णवी ही उच्चशिक्षित असून एका नामांकित आयटी (IT) कंपनीत नोकरीला होती. लग्नानंतर काही दिवस ती सुट्टीवर होती आणि त्यानंतर नोकरीनिमित्त बंगळुरू येथे गेली होती. जून महिन्याच्या अखेरीस ती पुन्हा पुण्यात उंड्री-वडाचीवाडी परिसरातील सासरी परतली आणि घरातूनच (Work From Home) काम करू लागली. मात्र, सासरी आल्यानंतर तिच्या छळात आणखी भर पडली. कंपनीचे काम सांभाळून तिला घरातील सर्व कामे करण्याची सक्ती केली जात होती. तसेच गाडीसाठी पैशांची मागणी करत सासरच्या मंडळींकडून तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरूच होता.

“मुलीला घेऊन जा, नाहीतर बरं-वाईट होईल…”; मध्यरात्री पतीचा धमकीचा फोन

२४ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास वैष्णवीने आपल्या आईला फोन करून सासरच्या त्रासाबद्दल सांगितले होते. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास पती ओंकार याने थेट वैष्णवीच्या माहेरी फोन केला आणि “तुमच्या मुलीला घरी घेऊन जा, नाहीतर माझ्याकडून काहीतरी बरं-वाईट होईल”, अशी उघड धमकी दिली.

या फोनमुळे घाबरलेल्या माहेरच्या मंडळींनी तातडीने वैष्णवीच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तिचा फोन लागला नाही. अत्यंत अस्वस्थ झालेल्या आई-वडिलांनी रात्रीच पुण्याकडे धाव घेतली.

पहाटे पोहोचले माहेरचे, समोर लेकीचा मृतदेह!

वैष्णवीचे आई-वडील पहाटे पुण्यात उंड्री येथील तिच्या सासरी पोहोचले, तेव्हा घरामध्ये वैष्णवीचा मृतदेह गोधडीने झाकलेल्या अवस्थेत ठेवलेला आढळला. वैष्णवीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे सासरच्या मंडळींनी सांगितले. अवघ्या चार महिन्यांपूर्वी ज्या लेकीला मोठ्या आनंदाने सासरी पाठवले होते, तिचा असा संशयास्पद आणि करुण अंत पाहून आई-वडिलांनी एकच आक्रोश केला.

या घटनेची माहिती मिळताच काळेपडळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती ओंकार घिसरे, सासू आणि सासऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मयत वैष्णवी जरांडे हिने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली ? याचा पोलिसांकडून वेगाने तपास केला जात आहे.