पदोन्नती झालेले सर्व अंमलदार पोलीस दलाची प्रतिमा उंचावतील – अण्णासाहेब जाधव

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (अफरोज पठाण ) पदोन्नती झाल्याने आपल्या कामाची जबाबदारी वाढते. आणि वाढलेल्या जबाबदारीने प्रामाणिकपणे काम केल्यास कामातील समाधान आणि जनतेत पोलिसांप्रती आदर वाढून एक चांगली सेवा आपण पार पाडतो. पदोन्नती झालेले सर्व अंमलदार अशीच सेवा पार पाडून पोलीस दलाची प्रतिमा उंचावतील असा विश्वास कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी व्यक्त केला. ते पदोन्नती मिळालेल्या पोलीस अमलदारांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते.

 

कर्जत उपविभागातील कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, बेलवंडी या पोलीस ठाण्यातील पोलीस अमलदारांच्या पदोन्नती झाल्याबद्दल कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पदोन्नतीप्राप्त अमलदारांना पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी शुभेच्छापत्र, लेखणी, आणि पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव उपस्थित होते.

अहमदनगर पोलीस दलांतर्गत पोलीस अमलदारांच्या पोलीस शिपाई ते पोलीस नाईक,पोलीस नाईक ते हवालदार, आणि हवालदार ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असे पदोन्नती देण्यात आल्या आहेत.

पदोन्नतीने जबाबदारी बरोबर अनुभवही वाढतो. तसेच जनतेत वावरताना पोलीस अंमलदारांच्या खांद्यावरील पदोन्नतीने त्यांच्या अनुभवाची आणि जबाबदारीची जाणीव होते. असे प्रतिपादन कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी केले.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की, पदोन्नतीच्या माध्यमातून पोलीस दलात चांगले तपासी अंमलदार पुढे येऊन आप आपल्या कामाचा दर्जा वाढवतील आणि पोलीस दलाची शान उंचावतील.