- Advertisement -

सरकारी पगारापेक्षा वाळू तस्करीच्या गोरखधंद्यात जास्त माल मिळतो का ?  : मस्तवाल व्हरकटेच्या कारनाम्याने कर्जत तालुक्यात आले वेगवेगळ्या चर्चांना उधाण

पोलिस अधीक्षक साहेब कर्जतमध्ये साफसफाई मोहीम गतीमान कराच - जनतेतून होत आहे मागणी

डॉ अफरोजखान पठाण । कर्जत । गेल्या दोन तीन दिवसांपासून कर्जत तालुका पुन्हा एकदा एका गंभीर घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात चर्चेत आला आहे. कर्जतमधील एका वाळूतस्कर पोलिस कर्मचाऱ्याने थेट प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना शिवीगाळ धक्काबुक्की करण्याचा मुजोरपणा केला. या घटनेमुळे कर्जतमधील वातावरण चांगलेच तापले आहे. महसुल विरूध्द पोलिस असा नवा संघर्ष निर्माण झाला की काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

कर्जतमधील त्या घटनेनंतर कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजले आहे. लोक विविध अंगाने चर्चा करत आहेत. यातून या घटनेचे पडसाद जनमाणसांत किती गांभीर्याने उमटले आहेत याचाच प्रत्यय येत आहे. गावागावात, चावडीवर, जिकडे तिकडे हाच विषय चर्चेचा झाला आहे.

पोलिस अधीक्षक साहेब जरा इकडे लक्ष द्या

साधारणता: वाळूची बेकायदेशीर तस्करी करताना एखादे वाहन पकडले तर महसुल विभागाकडून जवळपास दीड ऐक लाखाचा दंड ठोठावला जातो हे जगजाहीर आहे. ही बाब त्या वाळूतस्कर पोलिस कर्मचाऱ्याला माहित नव्हती का ?  वाळू तस्करीच्या गोरखधंद्यातील बारकावे माहीत असतानादेखील त्या मुजोर पोलिस कर्मचाऱ्याने चक्क आपली नोकरी का बरं पणाला लावली असेल ? याचा अर्थ सरकारी पगारापेक्षा वाळू तस्करीच्या काळ्या धंद्यात जास्त माल असल्याचेच या घटनेने अधोरेखित झाले आहे. पोलीस उपअधीक्षक साहेब आपल्या खात्यात आणखी दोन चार जण याच व्यवसायात आहेत. त्यांच्याकडे पण लक्ष ठेवा अन्यथा परवा प्रांताधिकारी होते कदाचित भविष्यात आणखी कोणी बडा अधिकारी मुजोर पोलिसांच्या कृष्णकृत्याचा शिकार बनेल त्या आधीच खाकीतील काळ्या बोक्यांच्या नांग्या ठेचायला हव्यात असा सुर गावागावातून निघत आहे.

केशव व्हरकटेचा प्रताप…

शुक्रवारी सकाळी कर्जतचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी शहराच्या बालाजीनगर भागात अवैध वाळू वाहतूक करणारा टीपर पकडला. वाहन चालकाजवळ वाळू वाहतूक करणारा परवाना आहे का ? याची तपासणी करताना कर्जत पोलीस उपअधीक्षक कार्यालयात कार्यरत असणारा पोलीस कर्मचारी कम वाळूतस्कर केशव व्हरकटे याने चक्क थोरबोले यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची घटना अनेक प्रत्यक्षदर्शीनी कथन केली. घटनेनंतर व्हरकटे याने तो टीपर नियोजित ठिकाणी खाली करीत पळवून नेला.

फिर्याद घेताना झालेला उशीर चर्चेचा…

घटनेनंतर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले,तहसीलदार नानासाहेब आगळे आणि महसुल कर्मचारी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले. उपविभागीय दंडाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांना सदर घडलेल्या घटनेची पाऊण पानांची फिर्याद नोंद करण्यासाठी तब्बल सहा तास अवधी लागला ते पण वरिष्ठ असताना. परंतू सर्वसामान्य नागरिकांची फिर्याद घेण्यासाठी पोलीस प्रशासन किती वेळ लावत असतील याची कल्पना न केलेली बरी असेच म्हणण्याची वेळ कर्जतकरांवर या घटनेच्या निमित्ताने आली.

एका घटनेने दमदार कामगिरीला लागले ग्रहण ?

आपल्या लोकाभिमुख कार्याने कर्जतकराच्या मनातील ताईत बनलेले पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव स्वता: कार्यालयात उपस्थित असताना त्यांनी फिर्याद घेण्याचा कालावधी कमी का केला नाही ? हा सवाल महसुल कर्मचाऱ्यांसह पत्रकारांना देखील पडला. तलाठी तक्रार दाखल करीत असताना दोन तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना देखील उपदेशाचा डोस देताना “आज आमच्या माणसाची वेळ आहे.म्हणून आम्ही गप्प आहोत. काही दिवसांनी तुमचीपण वेळ येऊ शकते तेव्हा आम्ही दाखवू. पोलीस काय चीज असते.” असे सुनावले. प्रांताधिकार्याना अरेरावी, शिवीगाळीसारखी गंभीर घटना असताना देखील पोलिसांनी महसुल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना धमकावणे हे जरा अतीच झाले.

प्रशासनात बेबनाव नकोच

पोलीस अधीक्षक साहेब प्रांताधिकारी शिवीगाळ प्रकरणात आपण अधिक लक्ष घालून कठोर कारवाईचा बडगा उगाराल ही कर्जतकरांची भावना आहे. कठोर कारवाई न झाल्यास भविष्यातही अश्याच घटना घडतील हे नाकारता येत नाही. प्रांताधिकारी शिवीगाळ  घटनेनंतर पोलीस आणि महसुल प्रशासनात दरी निर्माण झाली असल्याचे उघड दिसत आहे. आगामी काळात हीच दरी कायम राहिल्यास त्याचा फटका सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसह नागरिकांना देखील बसेल हे मात्र निश्चित.

ठाण मांडून बसलेल्यांना नेमका कुणाचा आशिर्वाद?

तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झालेले पोलीस कर्मचारी कर्जत पोलीस विभागात ठाण मांडून बसले आहेत. यातील काहींच्या बदल्या देखील झाल्या होत्या. मात्र ते साहेबांच्या खास मर्जीतील असल्याने त्यांच्या बदल्या रद्द झाल्या. कर्जतमध्ये ठाण मांडून बसलेल्या काही कर्मचाऱ्यांनी स्थानिकांना हातीशी घेत आपले अवैध व्यवसाय व्हाइट कॉलर प्रतिमेने पार पाडत आहेत अशी चर्चा खुलेआम होत आहे. या काळ्या धंद्यांना वरिष्ठांचा आशिर्वाद असल्याचेही बोलले जाते.

एसपी साहेब साफसफाई मोहीम गतिमान होणे आवश्यक

प्रांताधिकारी शिवीगाळ प्रकरणाच्या घटनेने कर्जतच्या पोलिस प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. जेथे कर्जत उपविभागाचा प्रांताधिकारी सुरक्षित नसेल तेथे सर्वसामान्य नागरिकांचे काय ? जे जनतेचे रक्षक म्हणून काम करीत आहे तेच कायदा धाब्यावर बसवत असतील तर मग अपेक्षा कोणाकडून करायची असा प्रश्न उभा राहत आहे. कर्जतमधील घटनेचा बोध घेऊन आता साफसफाई मोहीम गतिमान करण्याची आवश्यकता आहे हे मात्र निश्चित!

प्रांताधिकारी आहे असे सांगून सुध्दा…..

सरकारी नोकरी लागत नाही म्हणून नवतरुण आणि त्यांचे कुटुंब देव पाण्यात ठेवून साकडे घालत असतात. मात्र येथील पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे पोलीस उपअधीक्षक कार्यलयात छान पगारावर काम करीत असताना त्यास ही दुर्बुद्धी कशी सुचली देव जाणे. याचाच अर्थ असा होतो की अवैध व्यवसायात कमी श्रमात जास्त मोबदला मिळतो. व्हरकटे नोकरीत असल्याने तो निश्चित नुतन प्रांताधिकारी थोरबोले यांना ओळखत असणारच. शिवाय वाळूतस्करी करीत असल्याने त्यास ते माहीत देखील राहणार. तरी व्हरकटे यांने त्यांना अरेरावी-शिवीगाळ, धक्काबुक्की केली हे न उलगडणारे कोडे आहे.

आपला तो बाळू आणि लोकांचं ते कारटं

पोलीस प्रशासन काही मोजक्या गुन्ह्यात सर्वसामान्य माणसाची फार अबाल करतात. फिर्यादीत कोणी साधे नाव घेतले तरी विविध चौकशीचा ससेमिरा त्या आरोपीसह त्यांच्या कुटुंबियाच्या मागे लावतात. त्यांचे जीने मुश्किल करून सोडतात. मग आज तीन दिवस झाले तरी या प्रकरणात शांत का ? असे सवाल सर्वसामान्य नागरिक उभा करीत आहे. या भूमिकेबद्दल आपला तो बाळू आणि लोकांचे ते कारटे ही बिरुदावली देखील काहींनी लावण्यास सुरूवात केली आहे.