‘मी जात पंचायतचा पंच, ५ लाख रुपये दे नाहीतर खल्लास करू!’; कुटुंबावर जीवघेणा हल्ला, जामखेडमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ‘मी जात पंचायतचा पंच आहे. तुमच्या मुलीच्या लग्नाचे पाच लाख रुपये दिलेले नाहीत, ते तुला द्यावेच लागतील. माझा शब्द कोणी मोडत नाही आणि कोणी नादी लागत नाही,’ असा दम देत एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला चढवून बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना जामखेड शहरात घडली आहे. शहरातील आरोळे वस्ती येथे ३१ ऑगस्ट रोजी भरसकाळी साडेसहाच्या सुमारास हा गंभीर प्रकार घडला.

I am member of caste panchayat, pay ₹5 lakh or I’ll finish you off!, murderous attack on family; case registered against six individuals in Jamkhed,

या हल्ल्यात पती-पत्नीसह पुतण्या व भावजय गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत (BNS) विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबू तात्या शिंदे (वय ४९, रा. आरोळे वस्ती, जामखेड) यांनी अहिल्यानगर येथील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

‘मी जात पंचायतचा पंच… पाच लाख रुपये द्यावेच लागतील’

पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाबू शिंदे हे आपल्या कुटुंबीयांसह घरासमोर उभे होते. यावेळी वसंत तात्या लोखंडे, किरण वसंत लोखंडे, अक्षय वसंत लोखंडे, बाजीराव यल्लाप्पा लोखंडे, विलास यल्लाप्पा लोखंडे आणि सुनिता लक्ष्मण दासरजोगे हे सर्वजण बेकायदेशीररीत्या तिथे आले.

यावेळी वसंत लोखंडे याने आपण जात पंचायतचा पंच असल्याचे सांगत, ‘तुमच्या मुलीच्या लग्नाचे पाच लाख रुपये दिलेले नाहीत, ते तुला द्यावेच लागतील,’ अशी थेट खंडणीवजा मागणी केली. तसेच ‘आपला शब्द कोणी मोडत नाही आणि कोणी आपल्या नादी लागत नाही,’ अशी दमबाजी करत पैशांसाठी तीव्र दबाव आणण्यास सुरुवात केली.

लोखंडी गजाने डोक्यात वार; कापडात दगड बांधून बेदम मारहाण

आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून एवढी मोठी रक्कम देणे शक्य नाही, असे बाबू शिंदे यांनी हात जोडून सांगताच आरोपींनी शिवीगाळ करत अचानक हिंसक हल्ला चढवला. वादादरम्यान किरण वसंत लोखंडे याने हातातील लोखंडी गजाने बाबू शिंदे यांचा पुतण्या सागर बप्पू शिंदे याच्या डोक्यात जोरदार वार केला. या हल्ल्यात सागर शिंदे गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाला.
त्यानंतर बाजीराव यल्लाप्पा लोखंडे याने कपड्यात दगड बांधून बाबू शिंदे यांच्या पाठीवर आणि पोटावर अमानुष मारहाण केली. तर वसंत लोखंडे, अक्षय लोखंडे आणि विलास लोखंडे यांनी शिंदे यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

महिलांना मारहाण, दागिने गहाळ करत जीवे मारण्याची धमकी

घरातील पुरुषांना मारहाण होत असल्याचे पाहून बाबू शिंदे यांच्या पत्नी शांताबाई शिंदे आणि भावजय बेबी शिंदे या सोडवण्यासाठी धावून आल्या असता, आरोपींनी महिलांवरही हात उचलला. महिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या झटापटीत शांताबाई शिंदे यांच्या गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिने पडून गहाळ झाले आहेत.

मारहाणीचा आरडाओरडा ऐकून वस्तीवरील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळाकडे धावून आले. गर्दी जमा होत असल्याचे पाहून आरोपींनी, ‘आता वाचलात, पण पैसे दिले नाहीत तर खल्लास करू,’ अशी जीवे ठार मारण्याची धमकी देत तिथून पळ काढला.

सहा जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल

हल्ल्यानंतर जखमी बाबू शिंदे यांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी दिलेल्या जबाबावरून जामखेड पोलिस ठाण्यात सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी वसंत तात्या लोखंडे, किरण वसंत लोखंडे, अक्षय वसंत लोखंडे, बाजीराव यल्लाप्पा लोखंडे, विलास यल्लाप्पा लोखंडे आणि सुनिता लक्ष्मण दासरजोगे (सर्व रा. जामखेड) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ११५(२), ११८(१), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत. शहरात भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.