जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पारधी समाजातून संघर्ष करत पोलीस दलात स्थान मिळवून अनेक मुलींसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या ३१ वर्षीय पोलीस महिलेने कौटुंबिक छळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात घडली. संगीता राजेंद्र काळे ऊर्फ संगीता किरण भोसले असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिच्या पतीविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

संगीताचे माहेर बारामती तालुक्यातील करंजे येथे, तर सासर सुपे येथे आहे. विवाहानंतर त्या पती किरण भानुदास भोसले यांच्यासोबत डोंबिवली पश्चिम भागात राहत होत्या.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, संगीताचा सावळा रंग पतीला आवडत नसल्याने तो तिच्यावरून टोमणे मारत असे. तिच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घालणे आणि मारहाण करणे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घरातील वस्तूंच्या खरेदीवरून जास्त पैसे खर्च केल्याच्या कारणावरूनही दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून संगीताने बेडरूममध्ये स्वतःला कोंडून घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तिच्या मृत्यूस पतीने प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला असून करंजे येथील सुलोचना राजेंद्र काळे यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, संगीताच्या सासरच्या मंडळींकडून आर्थिक मागणीसह सातत्याने छळ करण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणात इतर सासरच्या मंडळींवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत नातेवाइकांनी तिचे पार्थिव वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या परिसरात आणले होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते आणि फौजदार राहुल साबळे यांनी नातेवाइकांची समजूत काढली. डोंबिवली पोलिसांकडून पुरवणी जबाब घेऊन इतर व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर संगीतावर सोमेश्वर मंदिराजवळील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
संगीताने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठा संघर्ष करत पोलीस दलात प्रवेश मिळवला होता. तिच्या यशामुळे पारधी समाजातील अनेक मुला-मुलींमध्ये शिक्षण आणि सरकारी नोकरीबाबत आत्मविश्वास निर्माण झाला होता. परिसरातील अनेक मुलींनी तिला आदर्श मानत पोलीस दलात प्रवेश केला.
पती किरण भोसले यालाही पोलीस भरतीसाठी संगीताने मार्गदर्शन केल्याचे सांगितले जाते. संघर्षातून स्वतःचे स्थान निर्माण करत समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या संगीताचा कथित कौटुंबिक छळानंतर झालेला मृत्यू करंजे आणि सुपे परिसरासाठी अत्यंत वेदनादायी ठरला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास विष्णुनगर पोलीस करत असून तक्रारीतील आरोप, सासरच्या इतर मंडळींची भूमिका आणि आत्महत्येमागील नेमकी पार्श्वभूमी याचा तपास केला जात आहे.