पुणे : राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यांपैकी एक असलेल्या चाकणमधील वाहतूक कोंडी, खराब रस्ते, पार्किंग, कचरा, अतिक्रमणे आणि सुरक्षेचे प्रश्न आता थेट शासनाच्या रडारवर आले आहेत. चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे आणि प्रलंबित प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने नव्हे तर ठोसपणे कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले आहेत.

विशेष म्हणजे, चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्डे आणि साईडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० अतिरिक्त जवान पुढील आठवड्यापासून तैनात करण्यात येणार असून, रस्त्यांवरील अतिक्रमणांविरोधातही येत्या शुक्रवारपासून मोहीम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शासकीय विश्रामगृह येथे चाकण परिसरातील विविध प्रश्न तसेच चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठित उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला. यावेळी खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चाकणमधील समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आणि संस्थांनी एकाच दिशेने काम करणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. चाकणच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने कामाचा रोडमॅप तयार केला असून, या समितीला आवश्यक ते सर्व सहकार्य शासनस्तरावर केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सुरक्षेसाठी १०० अतिरिक्त जवान
चाकण परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि वाढता वाहतूक ताण लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तातडीने १०० सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची कार्यवाही सुरू असून, आवश्यकतेनुसार नवीन पोलिस ठाणी उभारण्याबाबतही विचार सुरू आहे.
चाकण हे मोठे औद्योगिक केंद्र असल्याने देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात नागरिक आणि उद्योजक येथे येतात. त्यामुळे परिसरातील स्वच्छता, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधा दर्जेदार असणे आवश्यक असल्याचे पवार यांनी नमूद केले.
कचऱ्याच्या प्रश्नावर स्वतंत्र प्रकल्प
चाकण परिसरात रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात साचणारा कचरा आणि प्लास्टिक ही गंभीर बाब असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले. कचरा व्यवस्थापनासाठी एमआयडीसीशी चर्चा करून प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
चाकण परिसरातील १९ गावे आणि एमआयडीसी क्षेत्रासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून, प्लास्टिक कचऱ्यावरही स्वतंत्र उपाययोजना करण्यात येणार आहेत.
३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याची ‘डेडलाईन’
रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे आणि साईडपट्ट्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, कामात दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला.
रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक कोंडीची ठिकाणे आणि वाहतूक व्यवस्थापन याबाबत प्राधान्यक्रम ठरवून काम सुरू करण्यात आले आहे.
पार्किंगसाठी एका आठवड्यात व्यवस्था
एमआयडीसी परिसरातील पार्किंगचा प्रश्नही गंभीर बनला असून, उपलब्ध जागांचा योग्य वापर करून पार्किंगची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एमआयडीसीतील पार्किंगच्या जागा एका आठवड्यात कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रस्त्यावर उभे राहणारे ट्रक या पार्किंग ठिकाणी वळविण्यात येणार असून, गर्दीच्या वेळेत जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याचाही निर्णय घेतला जाणार आहे. औद्योगिक कंपन्यांच्या शिफ्टच्या वेळांमध्ये बदल करून वाहतुकीचा ताण कमी करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.
अतिक्रमणांवर आता कठोर कारवाई
चाकण परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न आता प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. “अतिक्रमण काढताना कोणाचीही गय केली जाणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतली.
अतिक्रमण निर्मूलनाच्या वेळी स्थानिक पातळीवरून विरोध किंवा अडथळे निर्माण झाल्यास कामाला विलंब होतो. त्यामुळे नागरिक, उद्योजक, संस्था आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई येत्या शुक्रवारपासून सुरू करून महिनाभरात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
वाहतूक कोंडीसाठी ‘ॲक्शन प्लॅन’
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणे-चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून तातडीच्या, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा ‘ॲक्शन प्लॅन’ निश्चित करण्यात आल्याची माहिती दिली.
दर शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे. आवश्यक ठिकाणी रस्ते रुंदीकरण, अतिक्रमण निर्मूलन, पार्किंग व्यवस्थापन, जड वाहनांवरील निर्बंध आणि शिफ्टच्या वेळांमध्ये बदल अशा उपाययोजनांवर टप्प्याटप्प्याने काम केले जाणार आहे.
वाहनांबरोबरच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले जाणार असून, आवश्यक ठिकाणी वॉकवे आणि सुरक्षित रस्ते विकसित केले जाणार आहेत.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीही औद्योगिक विस्तार, नागरिकरण आणि वाढती वाहतूक लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने पायाभूत सुविधांचा विस्तार सुरू केल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन आणि उद्योग विभाग यांच्या संयुक्त बैठकीत अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत उद्योजक तसेच वाहतूक, उद्योग आणि संबंधित क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या प्रतिनिधींनी विविध अडचणी मांडल्या. या अडचणी जाणून घेत संबंधित यंत्रणांना सकारात्मक आणि तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या.
चाकण आणि संपूर्ण औद्योगिक परिसरातील नागरिक व उद्योजकांना दर्जेदार रस्ते, सुरळीत वाहतूक, सुरक्षितता, स्वच्छता, पार्किंग आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.