आजपासून राज्यात पाऊस परतणार !

राज्यात मान्सून सक्रीय होण्यास पोषक वातावरण

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने महाराष्ट्रात पुन्हा आगमन केल्याचं दिसत आहे. विदर्भातील काही भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह  मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने आज वर्तवला आहे.या भागात पुढील तीन तास महत्वाचे असणार आहेत अशी माहिती हवामान विभागाचे (IMD) के. एस. होसळीकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

महाराष्ट्रात पाऊस लांबल्याने अनेक भागात पाणी टंचाईची समस्या तर शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचं संकट घोंघावत आहे. यंदा दुबार पेरणी टाळण्यासाठी हवामान खात्याकडून सातत्याने अलर्ट्स दिले जात आहेत. परंतु मान्सून पुन्हा सक्रीय होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जोवर दमदार समाधानकारक पाऊस पडत नाही तोवर शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पुणे, जळगाव, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी.रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही पुढील तीन तासांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला आहे. रायगड जिल्ह्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.तसेच या ठिकाणी वाऱ्याचा वेग हा ताशी ३० ते ४० किमी इतका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे अवाहन करण्यात आले आहे.मोठ्या झाडांखाली आसरा घेऊन थांबू नये असे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.

 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात सध्या मोसमी पावसासाठी पोषक वातावरण आहे. कोकणात८ व ९ जुलैला पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रापर्यंत त्याचा प्रभाव कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरातून कमी बाष्पाचा पुरवठा होत आहे. परिणामी ११  जुलैला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. त्याचा फायदा विदर्भ, मराठवाडय़ासह मध्य भारतात होईल. या भागात ०९ जुलै पासून पाऊस सुरू होईल तर ११  जुलै पर्यंत तेथे जोर वाढण्याची शक्यता आहे