प्रशांत पाटील कडाडले : तीन वर्षांत काय दिवे लावले ? त्याचा हिशोब द्या, जे ग्रामपंचायत सदस्यांचे होऊ शकले नाही ते जनतेचे काय होणार ?
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । आरोप करणं हे विरोधकांच काम असतं परंतू त्याआधी विरोधकांनी आपलं स्वता:च आत्मपरीक्षण करावं किंवा समोरच्यांवर आरोप करण्याइतके आपण योग्य आहोत का ? हेही तपासावं असे टीकास्त्र सोडत ज्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलयं, मागील तीन वर्षात तुम्ही काय केलयं? काय दिवे लावले ? याचाही हिशोब जनतेला द्यायला हवा. त्याआधी दुसऱ्याविषयी टीका करण्याचा आणि नाव ठेवण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही असे म्हणत शेतकरी विकास आघाडीचे नेते प्रशांत पाटील यांनी प्रशांत शिंदे यांचे नाव न घेता जोरदार फटकेबाजी केली.
शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या सभेत सरपंच प्रशांत शिंदे यांनी शेतकरी विकास आघाडीच्या नेत्यांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना शेतकरी विकास आघाडीचे नेते प्रशांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी सरपंच प्रशांत शिंदे यांच्या कारभाराचे वाभाडे काढले.
यावेळी बोलताना प्रशांत पाटील म्हणाले की, जवळ्याचेसरपंच म्हणतात की, दहा वर्षांपासुन ते जवळ्याच्या राजकारणात सक्रीय आहेत, तर मला त्यांना सांगायचं आहे की, ज्या वेळी संस्थेत हजर राहत होतात, स्व प्रदिप आबा असतील किंवा अन्य कुठल्याही माणसाबरोबर संस्थेत गेलात,तुम्ही ज्या ज्या वेळी राजकारण केलं, त्यावेळी तुम्हाला कधी जाणवलं का नाही की, आपण संस्थेत जावं, संस्थेत कश्या पध्दतीने कर्ज वाटप होतं, तिथं कश्या पध्दतीने कारभार केला जातो, सभासद किती वाढवले जातेत किंवा सभासद वाढलेत की नाही वाढले याची त्यांनी कधी दखल घेतली नाही.आज निवडणूक आली की, तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा आला, सभासदांचा कळवळा आला ? असे म्हणत विरोधकांकडून होत असलेले आरोप अतिशय चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत असे पाटील म्हणाले.
संस्थेकडून सभासद करून घेतले जात नाही यावर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपावर बोलताना प्रशांत पाटील म्हणाले की, विरोधकांना कुणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे किंवा त्यांच्या अभ्यास तरी कच्चा असावा, सध्या संस्थेचे 2869 सभासद आहेत. त्यापैकी 1667 मतदार आहेत. सातत्याने सभासद वाढत आहेत. असे सांगत संस्थेचे कर्जवाटप 10 ते 12 कोटींपर्यंत आहे.
कर्जमाफीचा लाभ मिळाला नसता तर कर्जवाटप 25 कोटींपर्यंत गेले असते, परंतू कर्जमाफीत जास्ती जास्त शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी संस्थेने प्रयत्न केले आणि सभासदांना मोठा फायदा झाला. तालुक्यातील इतर कुठल्याही संस्थेच्या तुलनेत जवळा सोसायटीचे कर्जवाटप जास्त आहे याची जाणिव विरोधकांनी ठेवावी असा टोला लगावत पाटील पुढे म्हणाले की, सभासदांमध्ये संभ्रम व्हावा असे बिनबुडाचे आरोप विरोधकांकडून होत आहेत. दिशाभूल करण्याचे काम त्यांनी सोडून द्यावं आणि प्रत्यक्ष खऱ्या परिस्थितीने निवडणुकीला सामोरं जावं असे थेट अवाहन पाटील यांनी विरोधकांना दिले.
एकच कुटूंब संस्थेचा कारभार सातत्याने पाहते या आरोपाला उत्तर देताना प्रशांत पाटील म्हणाले की, संस्थेचा इतिहास विरोधकांना माहित नाही, त्यांनी आधी संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन यांची यादी तपासून घ्यावी मगच आरोप करावेत, वास्तविक पाहता संस्थेचा कारभार समाजातील विविध घटकातील नेत्यांनी संभाळला आहे. त्यामुळे विरोधकांकडून करण्यात येत असलेले घराणेशाहीचे आरोप दिशाभूल करणारे आहेत असे सांगत असं काही नाही की घराणेशाहीने, परंपरेने तोच तोच चेहरा दिला जातो ही वस्तुस्थिती मुळीच नाही, त्यामुळे आमच्यावर जो आरोप केला जातोय हा अतिशय चुकीचा आहे असे स्पष्ट करत पाटील यांनी विरोधकांच्या आरोपांची हवा काढून घेतली.
गेल्या चार महिन्यांपुर्वी ग्रामपंचायतची जी पोटनिवडणुक झाली त्या निवडणूकीत निवडून आलेला सदस्य आज तुमच्या सोबत नाही, याच्यावरून लक्षात येतं की तुमचा हेकेखोरपणा, तुमची काम करण्याची पध्दत सर्वसामान्यांना किंवा ग्रामपंचायत सदस्यांना न्याय देणारी नाही. त्यामुळे सोसायटी निवडणुकीत तुमचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळेच सोसायटीच्या निवडणुकीत सर्व सभासदांनी तुम्हाला डावलण्यात निर्णय घेतला आहे अशी टीका प्रशांत पाटील यांनी केली.
तीन वर्षापुर्वी तुमच्या ताब्यात जनतेने ग्रामपंचायत दिली, परंतू 15 सदस्यांपैकी आज किती सदस्य तुमच्या सोबत आहेत ? कधी त्यांना तुम्ही विश्वासात घेतलयं का ? त्यांच्याबरोबर त्यांच्या विचाराची कामं कधी केलीत का ? यामुळे तुम्ही ज्या ग्रामपंचायत सदस्यांचे होऊ शकले नाहीत तर जनतेचे काय होणार अशी परिस्थिती आहे. अकार्यक्षम आणि निष्काळजी सरपंचाविरोधात जनता आज का एकवटली आहे ? ज्या जनतेने तुम्हाला 3 हजार मतांनी निवडून दिले तीच जनता तुम्हाला पाडण्यासाठी का एक झाली आहे ? याची जाणिव त्यांनी ठेवावी अशी खोचक टीक पाटील यांनी केली.
शेतकरी विकास आघाडीच्या ताब्यात संस्था आल्यास जो खातेदार तो कर्जदार ही योजना राबवली जाईल, तसेच काष्टी सोसायटीच्या धर्तीवर जवळा सोसायटी विविध योजना राबवणार आहे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना राबवणार यातून सभासदांना कुठलीही अडवणुक केली जाणार नाही असेही प्रशांत पाटील यांनी स्पष्ट केले.