Jamkhed taluka gram panchayat by-election | आघी सावरगावात बिनविरोध तर जवळा आणि नायगावात रंगणार राजकीय धुमशान !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Jamkhed taluka gram panchayat by-election । जामखेड तालुक्यातील चार  ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी आघी व सावरगाव ग्रामपंचायतीच्या एक एक जागा बिनविरोध झाल्या आहेत अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

जामखेड तालुक्यातील जवळा,सावरगावर नायगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांचे निधन झाल्याने व आघी येथील पद रिक्त राहिल्याने सध्या पोटनिवडणुका होत आहेत.

जाहिर झालेल्या पोटनिवडणुकीच्या निवडणूक प्रक्रियेत दि 30 नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला होता. 6 डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.(दिनांक 4 आणि 5 डिसेंबर सुट्टीचे दिवस वगळून) आज 7 डिसेंबर रोजी दाखल उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. 9डिसेंबर रोजी अर्ज माघार व चिन्ह वाटप होईल. 21 डिसेंबर रोजी मतदान , तर 22 रोजी मतमोजणी होणार आहे.

जामखेड तालुक्यातील ज्या चार ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी पोटनिवडणुक होत आहे त्यामध्ये जवळा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 5 मधील एका  सर्वसाधारण जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी 3 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. छाननीत सर्व अर्ज वैध ठरले आहेत. नायगाव ग्रामपंचायतमधील प्रभाग 1 मधील  सर्वसाधारण जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी 9 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.ते सर्व अर्ज वैध ठरले आहेत.  09 रोजी अर्ज माघारीनंतर येथील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

सावरगाव ग्रामपंचायतमधील प्रभाग 1 मधील अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी होणाऱ्या निवडणूकीसाठी योगेश दत्तात्रय वाघमारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. तर आघी येथील प्रभाग 3 मधील अनुसूचित जाती स्त्री या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी साधना कल्याण शिंदे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळ आघी व सावरगाव येथील निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

जवळा आणि नायगावात अर्ज माघारी न घेतले गेल्यास येथील लढती अतिशय चुरशीच्या वातावरण पार पडतील. सर्वच उमेदवार आपली ताकद पणाला लावतील. राजकीय प्रतिष्ठेत कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष असणार आहे.