जामखेड तालुक्यात गावोगावी अवतरणार प्रशासकीय गाडगेबाबा : समृध्द गावांसाठी जामखेड पंचायत समितीने कसली कंबर 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । समाज आणि प्रशासन यांच्यात निर्माण झालेली दरी भरून काढण्यासाठी जामखेड पंचायत समितीने मोठे पाऊल उचलले आहे.आता पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी सुट्टीच्या दिवशी गावोगावी जाऊन स्वच्छता मोहिम हाती घेताना दिसणार आहेत. यामुळे गावोगावी आता दर शनिवार व रविवारी प्रशासकीय गाडगेबाबा अवतरताना आणि काम करताना दिसतील.

या मोहिमेतून स्वच्छता हा जरी उपक्रम असला तरी त्यामाध्यमांतून खेड्यांशी संवाद, तेथील समस्या समजून घेणे आणि जनतेच्या संवादातून गाव विकासाच्या नव्या योजना राबवण्याचेही आराखडे थेट फिल्डवर आखले जातील. गाव पुढाऱ्यांना यानिमित्ताने प्रशासनाच्या सोबतीने विकासाच्या संकल्पनांच्या सृजनात्मक संवादाची मोठी संधी लाभणार आहे.

बहुतेकदा सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्याबद्दल जनमानसात बरीचशी चुकीची प्रतिमा आहे. याला अनेक कारणेही आहेत. ती प्रतिमा दुर करण्यासाठी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी नागरिकांची दुःख आणि समस्या अंत:करणापासून समजून घेतल्या पाहिजे. जास्तीत जास्त नागरिकांशी जोडून घ्यायला हवे, त्यातून प्रशासन आणि समाज यांच्यात निर्माण झालेली दरी कमी होईल आणि प्रशासनाची प्रतिमा उंचावेल. हाच हेतू साध्य करण्यासाठी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेत मोठे पाऊल उचलले आहे.

जामखेड पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामसेवक यांना सोबत घेत जामखेड पंचायत समितीने जामखेड तालुक्यातील गावे स्वच्छ करण्याचा संकल्प केला आहे. सरकारी कार्यालयांना दर शनिवारी आणि रविवारी सुट्टी असते. याच सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी दर शनिवारी पंचायत समितीची एक टीम सकाळी एका गावात जाते. गावातील पदाधिकारी कर्मचारी, युवक, महिला यांना सोबत घेऊन 2-3 तास सर्व गावात स्वच्छता केली जाते. ज्या गावात पंचायत समितीची टीम स्वच्छता करण्यासाठी जाते त्या गावातील स्वच्छता केल्यानंतर ही टीम गाव कारभारी व नागरिकांशी संवाद साधते. गावकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देते. तसेचअंधश्रद्धा निर्मूलन, जातिनिर्मूलन, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवर नागरिकांचे प्रबोधन करते.

शासकीय सुट्टीच्या दिवशी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी जेव्हा गावात स्वच्छता करण्यासाठी जातात तेव्हा अधिकारीपदाचा कुठलाही बडेजाव न करता सर्वजण स्वयंसेवकाच्या भूमिकेतून मोठ्या उत्साहात काम करताना दिसतात. ही सर्व प्रक्रिया राबवताना  ना कुणी अधिकारी असतो, ना कुणी कर्मचारी असतो. कोणतेही टार्गेट नाही, दबाव नाही. वरिष्ठांच्या ऑर्डर्स नाही. स्वयंप्रेरणेने सामाजिक बांधिलकी म्हणून राबणारे शासकीय हात ग्रामसमृध्दीचा नवा पॅटर्न निर्माण करण्यासाठी झटू लागल्याने पंचायत समितीच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

गाव समृद्धीसाठी आमचाही खारीचा वाटा – पोळ

जामखेड तालुक्यातील 15 गावांनी समृध्द गाव योजनेत सहभाग घेतला आहे. शासनाच्या माझी वसुंधरा, लखपती कुटुंब असे विविध उपक्रम तालुक्यात सुरू आहेत. गाव विकासात आमचाही वाटा असला पाहिजे. त्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी ‘नागरिक’ या भूमिकेतून दर शनिवारी तालुक्यातील एका गावात जाऊन श्रमदान, प्रबोधन आणि ग्रामसमृध्दी संवाद करायचे ठरवले आहे. त्यानुसार आमचे काम सुरू झाले आहे. खेड्यांना समृध्द करण्यासाठी सुरू झालेली ही चळवळ महाराष्ट्राला दिशा देणारी ठरेल असा विश्वास गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी व्यक्त केला.

फक्राबादमध्ये राबवण्यात आली स्वच्छता मोहिम

जामखेड तालुक्यातील फक्राबाद या गावाने समृद्ध गाव व माझी वसुंधरा या योजनेत सहभाग घेतला आहे. जामखेड पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी फक्राबादमध्ये स्वच्छता मोहिम राबवली. गावकऱ्यांनी संवाद साधला.