जामखेड : नान्नजमधील शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रणाबाबत कृषिदूतांनी केले सखोल मार्गदर्शन !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयात कृषी पदविकेचे शिक्षण घेत असलेल्या चतुर्थ वर्षातील कृषिदुतांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम आणि वनस्पती रोगशास्त्र विषयांतर्गत नान्नज येथे नुकतेच बोर्डो मिश्रण प्रात्यक्षिकाचे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सादरीकरण करत जनजागृती केली.

Farmers in Nannaj were given in-depth guidance by krushidoot about Bordeaux mixture

यावेळी कृषिदूतांनी शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रणाचे महत्व आणि त्याची प्रक्रिया सांगण्यात आली. बोर्डो मिश्रणात वापरलेला कळीचा चुना हा खडकविरहीत असावा, बोडों मिश्रण हे प्लॅस्टिक ड्रम किंवा प्लॅस्टिक बादलीमध्ये तयार करावे, मिसळताना दोन्ही द्रावण थंड राहतील, याची काळजी घ्यावी. तयार केलेले बोर्डो मिश्रण जास्त काळ ठेवू नये. ठेवायचे असल्यास कळीचा चुना आणि मोरचूदचे द्रावण मिक्स करू नये. बोर्डो मिश्रणाची फवारणी करण्यासाठी ते फवारणी यंत्रामध्ये भरताना गाळुन भरावे.

जर बोर्डो पेस्ट केलेली असेल तर ती जमिनीपासून १.५- २ फूट खोडाला वर लावावी आणि बुरशी खोड रोग नियंत्रणसंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सर्वत्र अनेक पिकांवर विशेषतः भाजीपाला आणि फळबागांवर पडलेल्या बुरशीजन्य रोगांवर एक प्रभावी उपाय म्हणून बोर्डो मिश्रणाचा उपयोग केला जात आहे. याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.

कृषिदूत तेजस गावडे, निखिल जगताप, सत्यम गायके, अनिल गव्हाणे, करण  यांनी नियोजन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.अनिल काळे, कार्यक्रम समन्वयक डॉ. सखेचंद अनारसे, केंद्र प्रमुख डॉ.दत्तात्रय सोनवणे , कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश निकम व विषय विशेषतज्ञ वनस्पतीशास्त्र डॉ. मनोज गुड यांचे मार्गदर्शन लाभले