आमदार राम शिंदेंकडून शिवभक्तांना श्रावण महिन्याची अनोखी भेट; पाटोद्याच्या संगमेश्वर देवस्थानसाठी मंजुर केला 2 कोटींचा निधी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील पुरातन मंदिरांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी सरकार दरबारी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. महायुती सरकारने जामखेड तालुक्यातील पाटोदा येथील संगमेश्वर देवस्थानसाठी सुमारे 2 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे. श्रावण महिन्यात संगमेश्वर भक्तांसाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी अनोखी भेट दिली आहे. यामुळे संगमेश्वर भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जामखेड तालुक्यातील पाटोदा व सांगवी गावांच्या सरहद्दीवर भवर व विंचरणा या दोन नद्यांचा संगम होतो. याठिकाणी संगमेश्वराचे पुरातन असे हेमाडपंथी मंदिर आहे. पाटोदा, भवरवाडी, सांगवी, खामगाव या भागातील जागृत देवस्थान म्हणून संगमेश्वर देवस्थान ओळखले जाते. या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. नवसाला पावणारे देवस्थान म्हणून या देवस्थानची ख्याती आहे. सदर देवस्थानचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी या भागातील जनतेने आमदार प्रा राम शिंदे यांना साकडे घातले होते.
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून संगमेश्वर देवस्थानचा विकास व्हावा यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी सरकारकडे पाठपुरावा हाती घेतला होता. शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. महायुती सरकारने पाटोदा येथील संगमेश्वर देवस्थानसाठी 2 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे.
पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून जामखेड तालुक्यातील पाटोदा येथील संगमेश्वर देवस्थान परिसरात भाविकांसाठी पाण्याची टाकी, सभामंडप, पुरूष व महिला स्वच्छतागृह, रस्ते क्राॅक्रीटीकरण व सुशोभीकरण कामांसाठी महायुती सरकारने एक कोटी 99 लाख रूपयांचा निधी मंजुर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 31 जुलै रोजी जारी केला आहे.
पाटोदा येथील संगमेश्वर मंदिर अतिशय पुरातन मंदिर आहे. या ठिकाणी महाशिवरात्री व श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होते. संगमेश्वर देवस्थान तालुक्यात प्रसिध्द आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय दुर व्हावी याकरिता या परिसराचा पायाभूत विकास करण्यात अशी मागणी या भागातील जनतेतून करण्यात येत होती. या मागणीची आमदार प्रा राम शिंदे यांनी तातडीने दखल घेतली. संगमेश्वर देवस्थानचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी आमदार शिंदे यांनी सरकारकडे पाठपुरावा हाती घेतला होता.
महायुती सरकारने आमदार राम शिंदे यांच्या मागणीनुसार संगमेश्वर देवस्थानच्या विकासासाठी दोन कोटींचा निधी मंजुर केला आहे. आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून संगमेश्वर देवस्थानचा कायापालट होणार आहे. संगमेश्वर भक्तांसह परिसरातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमेश्वर देवस्थानच्या विकासासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी भरिव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पाटोदा सेवा संस्थेचे चेअरमन अशोक महारनवर यांनी आमदार राम शिंदे यांचे परिसरातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.