जामखेड बाजार समितीचा मोठा निर्णय, खर्डा येथे सुरु होणार पशुधन बाजार  – सभापती शरद (दादा) कार्ले

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : जामखेड बाजार समितीच्या सभापती विराजमान झाल्यापासून शरद कार्ले यांनी नाविन्यपूर्ण निर्णयांचा धडाका लावला आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील उपबाजार आवारात दर गुरुवारी पशुधन बाजार सुरु करण्याचा निर्णय सभापती शरद (दादा) कार्ले यांनी घेतला आहे. जामखेड बाजार समितीने घेतलेल्या या निर्णयाचे तालुक्यातील शेतकरी बांधवांमधून स्वागत होत आहे.

Big decision of Jamkhed Bazaar Committee, Livestock Bazaar to start at Kharda - Chairman Sharad (Dada) Karle

पशुधन खरेदी विक्रीची खर्डा भागातच सोय व्हावी यासाठी जामखेड बाजार समितीच्या खर्डा उप बाजार आवारात दर गुरुवारी पशुधन बाजार भरविण्याचा मोठा निर्णय जामखेड बाजार समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. 21 सप्टेंबर 2023 रोजी पासून पशुधन बाजार भरविण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती जामखेड बाजार समितीचे सभापती शरद दादा कार्ले यांनी दिली.

जामखेडचा बैल बाजार राज्यात प्रसिध्द आहे. दर शनिवारी राज्यातील पशुपालक मोठ्या संख्येने पशुधनाची खरेदी – विक्री करतात. आता जामखेड पाठोपाठ खर्डा येथेही पशुधन बाजार भरविण्याचा निर्णय जामखेड बाजार समितीने घेतला आहे. खर्डा येथील उपबाजार आवारात शेळी, मेंढ्या, बोकड या पशुधनाच्या खरेदी विक्रीची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय जामखेड बाजार समितीने घेतला आहे. दर गुरुवारी हा बाजार भरणार आहे.

जामखेड तालुक्यातील पशुपालकांसह जामखेड शेजारील तालुक्यातील पशुपालक शेतकरी व व्यापाऱ्यांना जामखेड पाठोपाठ खर्डा बाजाराचा नवा पर्याय मिळणार आहे. यामुळे पशुधन खरेदी विक्रीच्या व्यवहारात वाढ होऊन बाजारपेठत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होताना दिसणार आहे. याचा थेट फायदा खर्डा शहराच्या बाजारपेठेला मिळणार आहे.

जामखेडला दर शनिवारी मोठ्या जनावरांचा बाजार भरतो. आता खर्डा बाजार समिती आवारात शेळी, मेंढ्या, बोकड या पशुधनाचा बाजार भरवला जाणार आहे. जामखेड बाजार समितीच्या या निर्णयामुळे जामखेड तालुक्यात पशुधन विक्रीसाठी दोन आठवडे बाजार उपलब्ध झाले आहे. जामखेड बाजार समितीच्या या निर्णयाचे शेतकरी वर्गातून स्वागत केले जात आहे.

दरम्यान, सध्या राज्यात लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव सुरु आहे. मोठ्या जनावरांचे आठवडे बाजार सर्वत्र बंद आहेत. परंतू  शेळी, मेंढ्या, बोकड या पशुधनाच्या खरेदी विक्रीसाठी जामखेड बाजार समितीच्या वतीने खर्डा उपबाजार आवारात पशुधन आठवडे बाजार सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर गुरुवारी हा बाजार नियमितपणे भरणार आहे. खर्डा परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी या बाजाराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे अवाहन जामखेड बाजार समितीचे सभापती शरद (दादा) कार्ले यांनी केले आहे.