Ashadhi Ekadashi Bakari Eid 2023 : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जामखेडच्या मुस्लिम समाजाने घेतला मोठा निर्णय, आषाढी एकादशीमुळे बकरी ईदची कुर्बानी नाही !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Ashadhi Ekadashi Bakari Eid 2023 : आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहेत. आषाढी एकादशी दिवशी बकरी ईदची कुर्बानी न देता ती पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय जामखेडमधील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.आषाढी एकादशी दिवशी ईदच्या नमाजचे पठण होईल.तर बकर्यांची कुर्बानी एकादशीच्या दुसर्या दिवशी होणार आहे. जामखेड पोलिस स्टेशनमध्ये आयोजित बैठकीत वरिल निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.
आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलिस स्टेशनच्या वतीने जामखेड शहरातील मुस्लिम बांधवांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील मौलाना, कुरेशी लोक उपस्थित होते. आषाढी एकादशी दिवशी मांस न विकण्याचा निर्णय कुरेशी समाजाने घेतला आहे. तसेच बकरी ईदची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. राज्याच्या सर्व भागातून लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर आहेत.विठूनामाचा जयघोष करत वेगवेगळ्या पालख्या विठूरायाच्या भेटीला निघाल्या आहेत. वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावोगावचे मुस्लिम बांधव सरसावले आहेत. ज्ञानोबा – तुकोबाचा समतेचा, मानवतेचा संदेश कृतिशीलपणे जपला जात असल्याचे यातून अधोरेखित होत आहे.
आषाढी एकादशी दिवशीच बकरी ईद हा सण येत आहे. वारकरी संप्रदयात आषाढी एकादशीला मोठे महत्व आहे. या दिवशी प्राणी हत्या टाळून बकरी ईदची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी हा निर्णय घेतला जात आहे. तसाच निर्णय जामखेडमध्ये सुध्दा घेण्यात आला आहे.
यावेळी जमियत उलेमा ए हिंदचे जामखेड तालुकाध्यक्ष मौलाना खलील कासमी म्हणाले की, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. आषाढी एकादशी हा वारकऱ्यांचा मोठा उत्सव असतो. यंदा याच दिवशी बकरी ईदचा देखील सण आहे. धार्मिक सहिष्णुता व एकमेकांच्या परंपरांचा आदर करण्यासाठी बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव कोणतीही प्राणी हत्या करून कुर्बानी देणार नाही. बकरी ईदच्या दिवशी सर्व कत्तलखाने बंद ठेवू. आषाढी एकादशी दिवशी बकरी ईदची नमाज होईल, कुर्बानी होणार नाही. एकादशीच्या दुसर्या दिवसापासुन पुढील दोन दिवस कुर्बानी होईल, असे मौलाना खलील कासमी म्हणाले.
यावेळी पोलिस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की, मुस्लिम समाजाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आणि आनंदायी आहे. या निर्णयामुळे जातीय सलोखा राखला जाईल, हिंदू – मुस्लिम भाईचारा अधिक बळकट होईल. आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही सण आनंदाने साजरे होतील. या सणांना गालबोट लावण्याचा कोणी प्रयत्न करून नये, अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
यावेळी जामखेड पोलिस स्टेशनमध्ये पार पडलेल्या बैठकीस, पोलिस निरीक्षक महेश पाटील, जमियत उलेमा ए हिंदचे जामखेड तालुकाध्यक्ष मौलाना खलील, कलीमुल्ला कुरेशी, उमर कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, हनीफ कुरेशी, कुरेशी कमिटीचे सदस्य आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.सर्वांनी आषाढी एकादशी दिवशी कुर्बानी न देण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
बैठकीत पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी दिलेल्या सुचना खालीलप्रमाणे
1) बकरी ईद व आषाढी एकादशी हे सण एकाच दिवशी असल्याने उघड्यावर कुर्बानी करू नये.
2) बकरे कापल्यानंतर त्यांचे वेस्टेज उघड्यावर तसेच रस्त्याच्या कडेला न फेकता ते खड्डा करून झाकून टाकावे.
3) कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये. जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
4) सध्या सोशल मीडिया वापरत असताना आपण कुठल्याही धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपहार्य मेसेज कोणाला पाठवू नये.