Vidhan Parishad election 2022 । ‘त्या’ दहा आमदारांवर विधान परिषद निवडणुकीचा निकाल अवलंबून ? दहाव्या जागेसाठी प्रसाद लाड विरुद्ध भाई जगताप यांच्यात चुरशीचा सामना

जामखेड टाइम्स वृत्तसेवा vidhan parishad election 2022 । विधान परिषदेची निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अनेक प्रयत्न झाले, परंतु या निवडणुकीत भाजपने पाचवा आणि काँग्रेसने दुसरा उमेदवार कायम ठेवल्याने विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येत्या 20 जुन रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदान होणार आहे. आमदार फुटू नयेत यासाठी महाविकास आघाडीला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने दिलेला दणका विधान परिषद निवडणूकीत बसू नये यासाठी महाविकास आघाडीला अधिक सतर्क राहावे लागणार आहे

संख्याबळानुसार भाजपचे 4, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचा 1 असे 9 उमेदवार सहज जिंकू शकतात. दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात चुरशीचा सामना होईल, यात कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

राजकीय चमत्कार घडणार- भाजप नेत्यांच्या वल्गना

दहाव्या जागेसाठी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार होऊ शकतो. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने राजकीय चमत्कार घडवत सहावी जागा जिंकल्याने भाजपचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. विधान परिषद निवडणुकीमध्येही राजकीय चमत्कार घडणार अशा वल्गना भाजपच्या नेत्यांकडून सुरु आहेत. त्यामुळे येत्या 20 रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने राजकीय चमत्कार घडवल्यास महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात

दरम्यान 10 जागांसाठी होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, उमा खापरे आणि प्रसाद लाड अशी पाच उमेदवार रिंगणात आहेत.तर शिवसेनेकडून सचिन आहेर आणि आमशा पाडवी हे दोन उमेदवार रिंगणात आहेत, राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे हे दोन ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेसकडून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप असे 11 उमेदवार रिंगणात आहेत.

विधान परिषद निवडणुकीत अपक्ष आणि छोटे पक्ष निर्णायक

दरम्यान विधानपरिषद निवडणुकीत निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 मते आवश्यक आहेत .27 मतांचा कोटा पूर्ण करणारा उमेदवार या निवडणुकीत विजयी ठरणार आहे.भाजप आणि महाविकास आघाडी यांच्या असलेल्या संख्याबळावर 9 उमेदवार सहज जिंकून येऊ शकतात तर दहाव्या जागेसाठी दोन्ही गटांना अपक्ष आणि छोट्या पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या पक्षांना मोठी किंमत आली आहे.

त्या दहा आमदारांवर विधान परिषद निवडणुकीचा निकाल अवलंबून ?

दरम्यान विधान परिषद निवडणुकीमध्ये आपला  पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. ज्या आमदारांनी राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपला मदत केली होती, त्याच आमदारांच्या मदतीवर विधान परिषदेत राजकीय चमत्कार घडवून आणण्याचा डाव फडणवीस खेळू शकतात असे आता राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूकीत भाजपला मदत करणाऱ्या त्या दहा आमदारांवर विधान परिषद निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे असेच सध्या तरी चित्र आहे.