पावसाळी अधिवेशन 2022 | उध्दव ठाकरेंच्या ‘या’ खेळीमुळे शिंदे गट अडचणीत

जामखेड टाइम्स वृत्तसेवा ।  महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्या बुधवारपासून सुरु होत आहे. शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतरचे हे पहिले अधिवेशन असणार आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे या लढाईच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन  वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशन काळात शिवसेनेच्या दोन गटात व्हिप वाॅर रंगणार हे स्पष्ट आहे. (Monsoon session 2022, Uddhav Thackeray’s move puts Shinde group in trouble)

Monsoon session 2022, Uddhav Thackeray's move puts Shinde group in trouble,

खरी शिवसेना खरी शिवसेना कुणाची? पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याबाबत सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे सुनावणी अजूनही प्रलंबित आहे. अश्यातच पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आणखी एक खेळी खेळली आहे. विधानसभेतील शिवसेनेच्या ५५ आमदारांना ठाकरेंनी व्हिप जारी केला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या आमदारांना व्हिप जारी केला आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पावसाळी अधिवेशनानिमित्त विविध शासकीय ठराव, प्रस्ताव सभागृहात आणले जाणार आहेत. अशावेळी मतदानाची संभावना असते. तेव्हा विधानसभेतील कामकाज संपेपर्यंत सभागृहात उपस्थित राहण्याबाबत आमदारांना व्हिप जारी केला आहे. एकीकडे विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद नेमले आहे. तर ठाकरे गटाकडून सुनील प्रभू हे मुख्य प्रतोद आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक विचित्र आणि विचार करण्यापलिकडच्या गोष्टी घडत आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध बंडखोर शिंदे गट असा सामना रंगला होता, आता पावसाळी अधिवेशनातही विधानसभेत शिवसेनेच्या दोन गटांमध्ये ‘व्हिप-वॉर’ सुरू राहणार आहे. उध्दव ठाकरे गटाने सेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी केला आहे. आता शिंदे गट काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.