- Advertisement -

अखेर ठरलं ! राज्यसभेच्या उमेदवारीबाबत शिवसेनेकडून संजय पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब, लवकरच अधिकृत घोषणा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यसभेच्या सहाव्या जागेची उमेदवारी कोणाला द्यायची ? यावरून गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या अनेक तर्क वितर्कांना आज पूर्णविराम मिळाला. शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेची उमेदवारी निष्ठावंत शिवसैनिक संजय पवार यांना जाहीर केली आहे. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. (Finally decided Shiv Sena seals Sanjay Pawar’s candidature for Rajya Sabha candidature, official announcement soon)

छत्रपती संभाजी महाराज यांना शिवसेना प्रवेशाची ऑफर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती, मात्र संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर धुडकावत शिवसेनेने पाठिंबा द्यावा अशी मागणी लावून धरली होती, मात्र शिवसेनेने कट्टर शिवसैनिक असलेल्या कार्यकर्त्याला राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे जेष्ठ नेते संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या उमेदवारीबाबत सुरू असलेला संभ्रम दूर करत कोल्हापूर जिल्ह्यातील निष्ठावान शिवसैनिक तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय पवार यांनी अत्यानंद व्यक्त केला. बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि उद्धवजींचा विश्वास, मी आज भरुन पावलो. माझा आनंद व्यक्त करण्याठी माझ्याजवळ शब्द नाहीयेत, अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली.

राज्यसभेच्या सहाव्या जागेबाबत गेल्या दोन दिवसांपासून मोठा सस्पेन्स होता. संभाजीराजे शिवबंधन बांधणार की शिवसेना दुसरा उमेदवार जाहीर करणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र काल भल्या पहाटेच शिवसेनेची ऑफर धुडकावून संभाजीराजे कोल्हापूरला निघून गेले. कालच्या दिवसभरात सेनेच्या गोटात मोठ्या घडामोडी घडल्यानंतर संजय पवार यांचं नाव चर्चेत आलं होतं.

संजय पवार यांचं नाव चर्चेत आल्यानंतर संभाजीराजेंनी घाईघाईत सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. उद्धवजींचं आणि आमचं ठरलंय, अशी मोजकी प्रतिक्रिया देत त्यांनी सस्पेन्स वाढवला खरा पण तोपर्यंत शिवसेनेने आपला पुढचा प्लॅन आखला होता. संजय पवार यांना सकाळीच मुंबईला येण्याचे आदेश दिले गेले होते. त्यानुसार सकाळीच संजय पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाले. दुपारी ३ वाजता ते मुंबईत पोहोचले. शिवालय इथे जाऊन त्यांनी खासदार अनिल देसाई यांची भेट घेतली.

बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि उद्धवजींचा विश्वास असल्याने आज माझी उमेदवारी जाहीर झाली. मी खरंच भरुन पावलो. माणसाने फळाची अपेक्षा न करता काम करायला पाहिजे. चांगलं काम केलं की फळ मिळतंच, आज मला माझ्या कामाचं फळ मिळालं, असं मानतो. आता उमेदवारी जाहीर झाली आहे म्हटल्यावर निवडणुकीसंदर्भातील पुढची तयारी तर करावी लागेल. आता तयारीला लागलो आहे, शिवसेना पक्ष प्रमुखांनी ठरवलंय म्हटल्यावर मैदानात तर उतरलोय, असं संजय पवार म्हणाले.

होय, संजय पवार यांचं नाव फायनल आहे. संजय पवार हा सेनेचा मावळा आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय. पण अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

दोन्ही जागा शिवसेनच्या आहेत. दोन्ही जागांवर शिवसेना लढेल आणि दोन्ही जागांवर सेनेचे उमेदवार जिंकून येतील. कोल्हापुरचे संजय पवार गेली ३० वर्ष शिवसैनिक आहेत. कडवट सैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. पक्का मावळा आहे आणि मावळे असतात म्हणून राजे असतात, हे ही लक्षात घ्या, राजांना पक्षाचं वावडं असू नये, अशी महत्त्वपूर्ण कमेंट संजय राऊत यांनी केली.