राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होणार, हवामान विभागाने दिला इशारा, येत्या चार दिवसांत ‘या’ जिल्ह्यात पाऊस होणार !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मागील आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील काही भागांत हजेरी लावली होती. त्यानंतर पाऊस थंडावला होता, आता राज्यात पुढील तीन ते चार दिवसांत पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Rain will be active again in the state, the meteorological department warned, it will rain in ‘Ya’ district in the next four days)

कोल्हापूर, सांगली, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर या भागात येत्या चार दिवसांत पाऊस सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत पुढील चार दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. राजस्थानच्या उत्तर पूर्व भागापासून ते उत्तर पूर्व अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच उत्तर पूर्व राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत उत्तर प्रदेश पार करून हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आहे.

यामुळे उत्तर भारतातील बहुतांश राज्यांत पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील कोकण, विदर्भ आणि कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पुढील चार दिवस पाऊस पडणार आहे.

बंगालच्या उपसागरासह अंदमानला दाखल झालेला मान्सून गेल्या तीन दिवसांपासून अनुकूल स्थितीच्या अभावामुळे अजूनही पुढे सरकू शकलेला नाही. दरम्यान, कोल्हापूर, कोकणसह राज्यातील काही भागांत चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मान्सून मुंबईत 10 जूनपर्यंत दाखल होतो. यंदा मात्र मान्सूनचं आगमन लवकर होणार आहे. दरम्यान मान्सूनच्या प्रवास योग्य दिशेने सुरू असल्याने 3 ते 9 जूनदरम्यान मान्सूनचे राज्यात आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर 10 ते 16 जूनदरम्यान मुसळधार पाऊस बरसेल असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून नियोजित वेळेच्या एक आठवडा अगोदर 22 मे ऐवजी 15 मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर पोहोचला. आता केरळमध्ये 27 मेपर्यंत आणि त्यानंतर मुंबईत 5 ते 6 जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. अशात हवामानतज्ज्ञ दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, मान्सूनचा आतापर्यंत प्रवास चांगला राहिल्यामुळे 20 ते 22 मे रोजी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.