शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीची कारवाई, कारखान्याची जमीन केली जप्त !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेनेचे मंत्री आणि आमदार बंडखोर झाल्याने राज्यातील सत्तासंघर्ष पेटला आहे. हे बंड शमवण्यासाठी पक्षाला यश येत नसल्याचे दिसत आहे तर दुसरीकडे ED कडून मंत्री अनिल परब यांची चौकशी सुरू आहे. अश्यातच शिवसेनेला धक्का देणारी आणखीन एक बातमी समोर आली आहे. (ED action against senior Shiv Sena leader, confiscated Arjun Khotkar’s factory land in Jalna)

शिवसेनेचे मराठवाड्यातील दिग्गज नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ED ने मोठी कारवाई केली आहे. जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची जमिन जप्त करण्यात आली आहे. ED च्या या कारवाईमुळे माजी मंत्री तथा शिवसेना नेते अर्जुन खोतकर अडचणीत आले आहेत. खोतकर यांच्यावरील कारवाई शिवसेनेला मोठा धक्का देणारी ठरली आहे.

जालना जिल्ह्यातील सावरगाव हडत येथील जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन, कारखान्याची इमारत, प्लांट आणि कारखान्याची यंत्रसामग्री ईडीने जप्त केली आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात पीएमएलए अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी ईडीने साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश दिले होते. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश ईडीने दिले होते. या कारखान्याचा वापर विक्री आणि व्यवहार करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. रामनगर साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणीत अर्जुन खोतकर यांची ईडी चौकशी करत आहे. आज ईडीने कारखान्याची जमीन जप्त केली.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 26 ऑगस्ट 2019 रोजी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ED ने PMLA अंतर्गत तपास सुरू केला आहे. हा एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाच्या 22 ऑगस्ट 2019 च्या आदेशानुसार नोंदविण्यात आला होता.

ईडीने पीएमएलए अंतर्गत केलेल्या तपासणीत असे दिसून आले होते की, मेसर्स जालना सहकारी कारखान्याची स्थापना 1984-85 मध्ये सुमारे 235 एकर जमिनीवर करण्यात आली होती. ज्यात 100 एकर जमीन महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही आर्थिक मोबदल्याशिवाय प्राप्त झाली होती. MSCB कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात कारखाना अयशस्वी ठरला होता.