मराठवाड्यात राजकीय भूकंप: “या” आमदाराने केली राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा ! ( Political earthquake in Marathwada: This MLA announced the entry of NCP )
जामखेड टाईम्स वृत्तसेवा। सत्तार शेख | राज्याच्या राजकारणात सध्या अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत.विरोधीपक्ष असलेल्या भाजपकडून सातत्याने आघाडी सरकार पडणार अश्या वल्गना केल्या जात आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये बेबनाव होत असल्याचेही लपून राहिलेले नाही.यामुळे तीनही घटक पक्षातील सर्वोच्च नेतृत्वाला पाच वर्षे आघाडी सरकार टिकणार हे रोज कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सांगावं लागत आहेे.राज्याची वाटचाल राजकीय अस्थिरतेकडे तर नाही ना ? असे चित्र निर्माण होऊ लागलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्याच्या राजकीय पटावर ज्या पध्दतीने सोंगट्या फिरवल्या जाऊ लागल्या आहेत.ते पाहता राष्ट्रवादीने आता आपला मोर्चा पक्ष बांधणीकडे वळवल्याचे दिसु लागले आहे.फोडाफोडीच्या राजकारणात वाकबदार असलेल्या राष्ट्रवादीने मराठवाड्यातील एका विद्यमान आमदारालाच गळाला लावल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Political earthquake in Marathwada: This MLA announced the entry of NCP)
राष्ट्रवादीच्या संख्याबळात पडली भर
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नुकतेच मराठवाड्याच्या दौर्यावर होते. या दौर्यात त्यांनी नांदेड जिल्ह्यात भेटी दिल्या. सध्या राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी नवा अॅक्शन प्लॅन घेऊन राज्यात जात आहे. राष्ट्रवादीने अगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून “मिशन 100” हाती घेतले आहे. नांदेड दौर्यात जयंत पाटील यांनी शासकीय कार्यक्रमांना हजेरी लावण्याबरोबरच राजकीय खलबतं केली. वेगवेगळ्या राजकीय शक्यता तपासुन पाहिल्या. त्यातच त्यांनी नांदेड (Nanded) जिल्ह्यातील लोहा-कंधार मतदारसंघाचे शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. चहापानाच्या बैठकीत राजकीय खलबतं शिजली. जयंत पाटलांच्या भेटीनंतर शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsundar Shinde) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. श्यामसुंदर शिंदे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ आता वाढणार आहे.
आमदार शिंदेंची राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांची काम करण्याची पध्दत आपल्याला आवडते. तसेच मतदारसंघाच्या विकासासाठी ते आपल्याला मदत करतील ही खात्री आहे.शिंदे यांच्या निवासस्थानी जलसंपदामंत्री जयंत पाटील हे चहापानासाठी आले होते. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आमदार शिंदे यांनी आज 27 जून रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस हा सध्या सत्तेत असणारा पक्ष आहे. त्यामुळे आपल्या मतदारासंघाची विकासकामं वेगाने व्हावीत यासाठी आपण राष्ट्रवादीत जात असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
आमदार श्यामसुंदर शिंदेंचा ‘तो’ यु टर्न
2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या श्यामसुंदर शिंदे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. देवेंद्रफडणवीस यांचं 72 तासात सरकार कोसळताच आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी यू-टर्न घेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता.