शरद पवार साहेब पुन्हा मैदानात, नथुराम गोडसेंची भूमिका करणाऱ्या अमोल कोल्हेंची केली पाठराखण, राष्ट्रवादीविषयी सोशल मिडीयावर संतापाची लाट !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी (Why I killed Gandhi) या सिनेमात नथुराम गोडसेची (nathuram Godase) भूमिका साकारली आहे. त्यामुळे वादंग उठलं आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी (NCP) काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांनी कलाकारांना पाठिंबा देत अमोल कोल्हेंची (MP Amol Kolhe) पाठराखण केली आहे. ( Sharad Pawar Saheb back on the field, following Amol Kolhe’s Nathuram Godse role, anger on social media about NCP)

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेची भूमिका व्हाय आय किल्ड गांधी या सिनेमात वठवली आहे. नथुराम गोडसेंचे उदात्तीकरण या चित्रपटातून करण्याचा प्रयत्न झाला आहे. यात नथुराम गोडसेची भूमिका अमोल कोल्हेंनी वठवल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कालपासून राजकीय व सामाजिक पटावर तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad) यांनी अमोल कोल्हेंवर संताप व्यक्त करत जोरदार फटकारले होते. परंतू दुसरीकडे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amil mitkari) यांनी वेगळीच भूमिका मांडत कोल्हेंचा बचाव केला होता. राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय ? यावर संभ्रम झालेला असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अमोल कोल्हेंच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी कोल्हेंची पाठराखण केल्याने सोशल मिडीयावर टीकेचा सूर उमटू लागला आहे.

अमोल कोल्हे प्रकरणावर शरद पवार नेमके काय म्हणाले ?

गांधी सिनेमातही कुणी तरी गोडसेची भूमिका साकारली होती. पण भूमिका करणारा व्यक्ती कलावंत होता. तो गोडसे नव्हता. कोणत्याही सिनेमात आर्टिस्ट एखादी भूमिका करत असेल तर त्याकडे आर्टिस्ट म्हणून पाहिलं पाहिजे अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे.

पवार पुढे म्हणाले, शिवाजी महाराज आणि औरंगजेब संघर्ष झाला. शिवाजी महाराजांच्या सिनेमात जर कुणी शिवाजी महाराजांची भूमिका घेत असेल आणि कुणी औरंगजेबाची भूमिका करत असेल तर औरंगजेबाची भूमिका करतो म्हणून तो मोगल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. तो कलावंत म्हणून भूमिका करत असतो.

किंवा रामराज्यातील सिनेमा असेल तर राम रावणाचा संघर्ष असेल रावणाची भूमिका करणारा व्यक्ती रावण असू शकत नाही. तो कलाकार असतो. सीतेचं अपहरण दाखवलं म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केलं असं होत नाही. रावणाचा तो इतिहास या माध्यमातून दाखवला जातो, असे म्हणत शरद पवारांनी अमोल कोल्हेंची पाठराखण केली

पवारांचा भाजपवर निशाणा

भाजपनेही अमोल कोल्हेंवर टीका केली आहे, याकडे पवारांचे मीडियाने लक्ष वेधलं. त्यावर, भाजप गांधीवादी कधीपासून झाले? भाजप आणि संघाच्या इतिहासावर मी भाष्य करू शकत नाही. एकेकाळी गांधीविरोधात वेगळी भूमिका घेणाऱ्या शक्ती आता नक्की कुठे आहेत हे पाहिलं पाहिजे., असं पवार म्हणाले.

आव्हाडांनी त्यांचं मत मांडलं

अमोल कोल्हे यांच्या सिनेमाला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. त्याबाबतही पवारांना विचारलं असता आव्हाडांनी त्यांचं मत मांडलं आहे, असं पवार म्हणाले.

कोल्हेंशी बोलणं नाही

अमोल कोल्हेंनी गोडसेची भूमिका साकारली असेल तर ती कलावंत म्हणून केली आहे. त्याकडे कलाकार म्हणूनच पाहिलं पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या विषयावर अमोल कोल्हे यांच्याशी बोलणं झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच कलावंत म्हणून मी कोणत्याही कलावंताचा सन्मान करतो. कलावंत म्हणूनच त्यांनी ती भूमिका साकारली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

अमोल मिटकरी अमोल कोल्हेंच्या पाठीशी

खासदार अमोल कोल्हेंनी साकारलेल्या नथुराम गोडसे भूमिकेवरून वादंग उठलेले असतानाच यात आमदार अमोल मिटकरी यांनी अमोल कोल्हेंची पाठराखण केली आहे. त्यांनी यासंबंधी एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी आव्हानात्मक भुमिका साकारली. एक अभिनेता म्हणुन त्यांनी नथुराम ची भुमिका पार पाडली असेल याचा अर्थ त्याचे समर्थन केले असे नाही. रामायणात त्रिवेदी यांनी रावणाची साकारलेली भुमिका आठवा प्रत्यक्षात मात्र ते रामभक्त होते हे वास्तव आहे असे लिहीत कोल्हेंचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सोशल मिडीयावर संताप

खासदार अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेची चित्रपटात भूमिका केल्याने वाद निर्माण झाला आहे. या वादात राष्ट्रवादीचा एक गट कोल्हेंच्या समर्थनार्थ पोस्ट लिहीत आहे. यावर आता सोशल मिडीयावर संताप व्यक्त केला जात आहे. कोल्हे समर्थक नेत्यांच्या पोस्टवर टीकेचा भडिमार होऊ लागला आहे. एकुणच या प्रकरणात राष्ट्रवादीविषयी नकारात्मक वातावरणात राज्यात निर्माण होऊ लागले आहे.

महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही  – काँग्रेस

नथुराम गोडसेचे उदात्तीकरण असलेला चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. अमोल कोल्हेंच्या चित्रपटामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडणार असेच दिसत आहे.