कर्जत : दोन किलो सोने चोरीतील आरोपी कर्जत आणि पुणे पोलिसांकडून संयुक्त कारवाईत जेरबंद करण्यात आले असून त्यांचेकडून एक किलो सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस ठाणे(पुणे ग्रामीण)हद्दितुन ता.२०ऑक्टोबर रोजी रात्री फिर्यादी सोबत बसमध्ये प्रवास करताना कोल्हापूर ते खेड शिवापूर टोल नाका दरम्यान नक्की वेळ माहीत नाही फिर्यादी हे प्रवास करीत असताना खबर देणार यांचे सोबत होळी, कर्नाटक पासून प्रवास करणारे प्रवासी सीट नंबर २३, २४ ,व २५ वरून प्रवास करणारे तीन अनोळखी इसमाने खबर देणार यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली ८१ लाख २४ हजार किमतीचे २११०ग्रॅम वजनाचे १८ कॅरेट चे सोन्याचे वेगवेगळे दागिने १८लाख रोख रक्कम असे एकूण ९९लाख २४हजार रूपयांचा ऐवज असलेली खाकी रंगाची पाठीवर अडकवण्याची बॅग खबर देणार यांचे संमतीशिवाय चोरी करून गेले आहेत.
सदर गुन्ह्याची राजगड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे फिर्याद दाखल आहे. गुन्ह्यातील संशयीत फरारी आरोपी नामे मारुती राजाराम पिटेकर( वय-४५ वर्षे, रा. माळंगी , ता. कर्जत) आनंता लक्ष्मण धांडे ( वय-४० वर्षे, रा. वालवड,ता.कर्जत, जि. अहमदनगर) यांना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि सतीश गावित, सुरेश माने, पोलीस जवान शाम जाधव, जालिंदर पाचपुते, सुनील खैरे, गोवर्धन कदम आणि राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सपोनि प्रवीण पोरे व राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस जवान असे पहाटे पाच वाजता मोठ्या शिताफीने माळंगी (ता.कर्जत) येथून संयुक्त कारवाई करुन यातील वरील नमूद आरोपी यांना ताब्यात घेत कर्जत पोलीस ठाण्यात आणले.
यातील आरोपी यांना कसून विचारपूस करुन गुन्ह्यातील जवळपास एक किलो सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रवीण पोरे करत आहेत. पुणे पोलीस सदर प्रकरणात खोलवर तपास करून आणखी कोण-कोण सामील आहेत ? याबाबत सखोल तपास करून आरोपी अटक करणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
सदर आरोपींवर कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील कराड शहर, नंदुरबार व इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि सतीश गावित, सुरेश माने, पोलीस जवान शाम जाधव, जालिंदर पाचपुते, सुनील खैरे, गोवर्धन कदम, जयश्री गायकवाड यांच्यासह राजगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सपोनि प्रमोद पोरे, उपनिरीक्षक लोणकर, पोलीस जवान नाना मदने, योगेश राजवडे, महेश खरात, सोमा जाधव, भोर आदी सहभागी झाले होते.