Jamkhed Letest political news | मंगळवारी होणार राष्ट्रवादीचा इनकमिंग धमाका : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर जामखेड दौर्‍यावर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । Jamkhed Letest political news | राष्ट्रवादीकडून मंगळवारी होणाऱ्या पक्ष प्रवेश सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या आक्रमक नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर उपस्थितीत राहणार आहेत.या कार्यक्रमाच्या माध्यमांतून राष्ट्रवादीकडून अगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

युवा नेते तथा जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे व उपसरपंच काकासाहेब वाळूंजकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पक्ष प्रवेशाचा हा कार्यक्रम जामखेड तालुक्यातील नान्नज ग्रामपंचायत कार्यालयासमोर मंगळवारी सायंकाळी होणार आहे. आमदार रोहित पवार व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर प्रथमच जामखेड तालुका दौऱ्यावर येत आहेत. चाकणकर ह्या अतिशय आक्रमक भाषणासाठी राज्याच्या राजकारणात प्रसिध्द आहेत. चाकणकर कुणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमातून राष्ट्रवादीकडून निवडणुकीची जोरदार वातावरण निर्माण केले जाणार आहे. राष्ट्रवादीकडून इनकमिंग मोहिम गतिमान करण्यात आल्याने विरोधी गोटात अस्वस्थता पसरली आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करू नयेत यासाठी पडद्याआड मोठ्या हालचाली सुरू आहेत. नाराजी दूर करण्यासाठी अश्वासने दिली जात आहेत मात्र अनेक कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे समोर येत आहे.

मंगळवारी राष्ट्रवादीच्या इनकमिंग मोहिमेत कोण कोण प्रवेश करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.तसेच मंगळवारी नान्नजमध्ये होणारा कार्यक्रम जोरदार व्हावा याकरिता राष्ट्रवादीकडून पुर्ण ताकद लावण्यात आली आहे. या कार्यक्रमातून प्रशांत शिंदे यांना लाँच करण्याची तयारी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.