कर्जत प्रतिनिधी : २५ ऑक्टोबर | कर्जतचा आठवडे बाजार मुख्य बाजारपेठेत भरवला जावा अशी सगळ्यांचीच इच्छा होती. अनेकदा तशी मागणी करण्यात आली पण याची कोणीच दखल घेतली नाही. आठवडे बाजार संबंधीच्या प्रश्नावरून आक्रमक झालेल्या कर्जत भाजपने सोमवारी अनोखे अंदोलन केले आणि सोमवारचा आठवडे बाजार मुख्यपेठेत भरविण्यात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना यश आले. व्यापारी व नागरिकांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला.या निर्णयामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला.
कोणत्याही अधिकाऱ्यांचा अरेरावीपणा भाजपा सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया भाजप युवा मोर्चाचे विनोद दळवी यांनी दिली.तसेच यापूर्वी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नगरसेविका मनीषा सोनामाळी यांनी देखील पत्रकाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
सोमवारचा कर्जतचा आठवडे बाजार अनेक वर्षांपासून मुख्य बाजारपेठेत भरविला जात होता. सर्वांसाठी हा बाजार सोयीस्कर ठरत असताना अचानक मागील वर्षी कोरोना पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळण्याच्या अनुषंगाने दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात कर्जत नगरपंचायतीने आठवडे बाजार भरविण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षीपासून हा बाजार अहमदनगर – बारामती मार्गावरच सुरू राहीला. बाजार पटांगणात भरत असल्याने गावातील मुख्य बाजारपेठेस याचा मोठा आर्थिक फटका बसत होता. याबाबत अनेक व्यापाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया शासन दरबारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. मात्र त्यास यश मिळत नव्हते.
सोमवार, दि २५ रोजी भाजपाचे विनोद दळवी, अनिल गदादे, अशोक खेडकर, वैभव शहा, काकासाहेब धांडे, अक्षय क्षीरसागर, स्वप्नील सोनामाळी, आदित्य भोज, राजेंद्र येवले, गणेश शिंदे, मुबीन बागवान यांनी भल्या पहाटे दादा पाटील महाविद्यालयासमोरील पटांगणात ठाण मांडत बाजारविक्रेते, व्यापारी यांच्याशी चर्चा करून आजचा बाजार पहिल्या ठिकाणीच बाजारतळात घ्यावा अशी मागणी लावून धरली. त्यास विक्रेते आणि व्यापारी बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद देत पूर्वीच्या ठिकाणीच बाजार भरविला गेला. यावेळी नागरिकांनी देखील पूर्वीच्या ठिकाणी बाजार सुरू झाल्याने धन्यवाद व्यक्त केले. बाजार पूर्वीच्या ठिकाणी भरवावा यासाठी नगरसेविका मनीषा सोनमाळी यांनी देखील पाठपुरावा केला होता.
भाजपाच्या आंदोलनाचे यश – विनोद दळवी
अनेक वर्षांपासून कर्जतचा आठवडे बाजार मुख्य बाजारतळातच भरत होता. कोरोनाचे संकट आले आणि बाजार दुसऱ्या ठिकाणी गेला. स्थानिक व्यापाऱ्यांसह नागरिकांचे नुकसान होत असताना अनेकदा पाठपुरावा करून देखील नगरपंचायत प्रशासन याकडे कानाडोळा करीत होते. आज सकाळी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत बाजार पूर्वीच्या ठिकाणी भरविण्यात मोलाचे सहकार्य केले. विक्रेत्यांनी देखील आमच्या आंदोलनास सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांचे आभार.