Political firecrackers explode in Karjat | कर्जतमध्ये फुटू लागले राजकीय फटाके : सोनमाळी विरूध्द सोनमाळी शाब्दीक युध्द जुंपले 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख, अफरोज पठाण । Political firecrackers explode in Karjat ।  कर्जत- जामखेड मतदारसंघात राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडत आहे. राम शिंदे विरूध्द रोहित पवार या संघर्षात आता दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते आपापल्या नेत्यांच्या बचावासाठी मैदानावर उतरले आहेत. कर्जतच्या राजकारणात सोनमाळी विरूध्द सोनमाळी हा नवा राजकीय डाव रंगला आहे. ऐन दिवाळीत कर्जतमध्ये राजकीय फटाके फूटू लागल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

राम शिंदे यांनी मागील आठवड्यात रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावर रोहित पवारांनी पलटवार करत जोरदार निशाणा साधला होता. दोन्ही नेत्यांनी राजकीय बॅटींगसाठी जामखेड तालुक्यातील हळगावचे मैदान निवडले होते. जामखेडमध्ये झालेल्या आरोपांवर आता कर्जतमधील दुसर्‍या फळीतले नेते मैदानात उतरून उत्तर देत आहेत.

रोहित पवारांवर भाजपचे नेते दादा सोनमाळी यांनी जोरदार निशाणा साधल्यानंतर आता पवार गटाकडून कर्जतच्या नगरसेविका मनीषा सोनमाळी ह्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे. या सर्व घडामोडीत आता कर्जतमध्ये सोनमाळी विरूध्द सोनमाळी हा सामना रंगला आहे. एक सोनमाळी शिंदेंचा किल्ला लढवत आहेत. तर दुसरे सोनमाळी पवारांचा किल्ला लढवत आहेत.ऐन दिवाळीत कर्जतमध्ये राजकीय फटाक्यांची आतिषबाजी जोरदार रंगली आहे.

राष्ट्रवादीच्या मनीषा सोनमाळी यांचे प्रत्युत्तर

आ रोहित पवार यांचे विकासकामे पाहता विरोधकांमध्ये पोटशूळ उठली असून केवळ राजकीय हेतू पुढे ठेवत आ पवार यांच्यावर आरोप करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. आगामी काळात सर्वसामान्य जनताच त्याचे उत्तर विरोधकांना देतील असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा तथा नगरसेविका मनीषा सोनमाळी यांनी भाजपाच्या दादा सोनमाळी यांना दिले.

यावेळी पुढे बोलताना मनीषा सोनमाळी म्हणाले की, भाजपाचे दादा सोनमाळी यांचे आरोप बिनबुडाचे असून केवळ राजकीय स्वार्थ पुढे ठेवत त्यांनी आ रोहित पवार यांना लक्ष केले आहे. मतदारसंघात सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी “आमदार आपल्या दरी” उपक्रम राबवत आहे. यावेळी शासकीय कार्यलय आणि अधिकाऱ्यांकडे असणारे काम तात्काळ मार्गी लागत असून दादा सोनमाळी केवळ स्वताच्या स्वार्थापायी “आ पवार मतदारसंघात फिरताना पोलीस बंदोबस्त घेतात” अशी चुकीची विधाने करीत आहे.

वास्तविक पाहता आ पवार हे सर्वसामान्य जनतेत राहून काम करणारे नेते आहेत त्यांना कसल्याही पोलीस संरक्षणाची गरज नाही. यापूर्वीच त्यांनी स्वता:हुन पोलीस संरक्षण नाकारलेले आहे. मतदारसंघात विविध निधीतून विकासकामे सुरू आहेत. काम करताना स्वता लक्ष घालून ती कामे दर्जेदार राहतील यासाठी प्रयत्नशील आहे.

कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सदगुरु गोदड महाराज यांची ग्रंथसंपदा जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आ रोहित पवार यांनी केले आहे. यासह राज्य सरकारच्या  माध्यमातून शिक्षण, आरोग्य, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भरीव काम उभारले जात आहे.

नुकतेच नगर- सोलापूर महामार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यास देखील यश मिळाले. प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेत कर्जत- जामखेड मतदारसंघ आदर्श मतदारसंघ राहील यासाठी काम करीत असताना भाजपाचे दादा सोनमाळी फक्त राजकीय हेतू समोर ठेवून जनतेच्या हितासाठी अविरत काम करणाऱ्यावर टीका करीत स्वताची राजकीय पोळी भाजत असल्याचा गंभीर आरोप मनीषा सोनमाळी यांनी केला.

मतदारसंघातील सर्वच प्रमुख अधिकारी योग्य काम पार पाडत असून अशा विधानाने त्यांचे खच्चीकरण करणाऱ्यानी आपली स्वताची कुवत, जनमत आणि प्रभागातील स्थिती तपासून करावी असा टोला देखील दादा सोनमाळी यांना लगावला.

काय होता भाजपच्या दादा सोनमाळी यांचा आरोप ?

मागील दोन वर्षांपासून आ रोहित पवार यांनी विकासाचे एकही मोठे काम केलेले नसून त्यांचा सोशल मीडिया, भिंतीवर आणि कागदावरच विकास सुरू आहे. सध्या तरी मतदारसंघात लहरी राजा – आंधळी प्रजा आणि अंधातरी दरबार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशी घणाघाती टीका कर्जत भाजपाचे नेते दादा सोनमाळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे रोहित पवारांवर केली आहे.

यावेळी आपल्या प्रसिद्धी पत्रकात सोनमाळी यांनी आ रोहित पवार यांनी दोन वर्षात मतदारसंघात एक ही मोठे विकासकाम केले नसल्याचे स्पष्ट सांगितले. पूर्वीच मंजूर असलेली कामे सध्या सुरू असून ती कामे सुद्धा नित्कृष्ट होत असल्याने त्यास जबाबदार कोण ? असा सवाल सोनमाळी यानी उपस्थित केला आहे.

येत्या सहा महिन्यात मतदारसंघातील विकासकामे पाहून माजीमंत्री राम शिंदे यांचे डोळे पांढरे होतील असे आ पवार म्हणत असताना तुमच्या कार्य पद्धतीमुळे जनतेचे डोळे पांढरे होण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळेच आपण पोलीस बंदोबस्त घेवून फिरत आहात असा टोला सोनमाळी यांनी लगावला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर असताना तालुक्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित राहत नाही. मात्र स्वता:आमदार आणि त्यांचे नातेवाईक मतदारसंघात येताच हे अधिकारी जातीने उपस्थित राहत असल्याची वस्तुस्थिती सोनमाळी यांनी विषद केली.

प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या कारभाराची चौकशी करा

वास्तविक पाहता माजी मंत्री राम शिंदे व खासदार डॉ सुजय विखे यांच्या प्रयत्नातून अहमदनगर सोलापूर महामार्गाचे काम मंजूर झाले. खातेदार आणि लाभार्थी यांच्या नुकसान भरपाईसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला होता मात्र यामध्ये अनेक ठिकाणी काळंबेरं झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला.  याबाबत खा सुजय विखे यांच्याकडे अनेक तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या. तत्कालीन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या कार्यकाळातील संपूर्ण कारभाराची चौकशी करावी अशी मागणी दादासाहेब सोनमाळी यांनी केली आहे.

शासकीय अधिकारी की राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते?

कॅबिनेट मंत्री तालुक्यात असताना कोणतेही  प्रमुख अधिकारी त्यांच्या प्रोटोकॉलला उपस्थित होत नव्हते मात्र रोहित पवार आणि त्यांचे कुटुंबीय मतदारसंघात असताना तेच सर्व अधिकारी त्यांच्या दिमतीला हजर राहतात. नेमके अधिकारी- अधिकारीच आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे असा गंभीर आरोप यावेळी सोनमाळी यांनी प्रसिद्ध पत्रकात केला आहे.