कर्जतमध्ये आमदारांकडून लोकशाहीचा खून : अंबादास पिसाळांचा हल्लाबोल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : डाॅ अफरोज पठाण | कर्जत नगरपंचायतीच्या उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्याने अखेर माजीमंत्री राम शिंदे यांनी प्रशासनास जाब विचारला. भाजपाच्या उमेदवारांवर राष्ट्रवादीच्या विद्यमान लोकप्रतिनिधीनी दबाव आणला आणि त्यांना दहशतीने अर्ज माघार घ्यायला लावल्याचा गंभीर आरोप केला. राम शिंदे यांनी ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज यांच्या मंदिरात मौन व्रत धारण करीत आंदोलन सुरू केले आहे.

कर्जत नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक सुरू असून कालपर्यंत सर्वत्र शांतता असणारी निवडणूक सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी वादळी ठरली. जोगेश्वरवाडी प्रभाग क्रमांक २ च्या भाजपाचे अधिकृत उमेदवार नीता अजिनाथ कचरे यांच्यावर विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी दबाव आणत त्यांना माघारी घ्यायला लावला अशी माहिती माजीमंत्री राम शिंदे यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ कर्जत नगरपंचायत कार्यालयात धडक घेत प्रशासनास लोकशाहीचा अपमान करीत असल्याचा आरोप केला. यावेळी माजीमंत्री राम शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले आणि सहायक गोविंद जाधव यांना जाब विचारला.

नीता कचरे यांना उमेदवारी अर्ज माघार घ्यायला ज्या व्यक्तीने आणले त्यांना आत घेण्याचा अधिकार आहे का ? लोकशाहीमध्ये मतदानाचा व उमेदवारीचा सर्वाना अधिकार आहे अशा पद्धतीने यापूर्वी कधी ही घडले नाही. सर्वसामान्य जनतेच्या हक्कावर आपण गदा आणत आहात असा सवाल उपस्थित करीत प्रशासनास धारेवर धरले.  कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदाराच्या दबाव आणि दडपशाहीत भाजपाच्या फॉर्म काढल्याने संत श्री सदगुरु गोदड महाराज मंदिरासमोर न्याय हक्कासाठी मौन ठिया आंदोलन सुरू केले आहे.

Karjat Nagar Panchayat Election

यावेळी भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उग्र भावना व्यक्त करीत आ रोहित पवार यांच्या दडपशाहीचा निषेध करीत गोदड महाराजानी त्यांना सदबुद्धी देवो अशी मागणी घातली. यावेळी जिल्हा बँकेच्या संचालक अंबादास पिसाळ, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, दादासाहेब सोनमाळी, अनिल गदादे, काका धांडे, तारक सय्यद, गणेश क्षीरसागर, बापू शेळके, विशाल काकडे, सागर कांबळे, विनोद दळवी, पप्पू धोदाड, सुनील यादव, राम ढेरे, महिला उमेदवार शिबा सय्यद, अश्विनी दळवी, सारिका क्षीरसागर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आमदारांकडून लोकशाहीचा खून आणि घात – अंबादास पिसाळ

सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी विद्यमान आ रोहित पवार यांनी भाजपाच्या उमेदवारांवर दहशत, दडपशाही आणि आर्थिक आमिष दाखवत त्यांना अर्ज माघार घेण्यासाठी दबाव आणला. ते मतदारसंघात लोकशाहीचा खून आणि घात करत असल्याचा गंभीर आरोप अंबादास पिसाळ यांनी केला. गडचिरोली-गोंदिया भागात अशा घटना घडत होत्या त्या कर्जतमध्ये घडत असल्याचे दुःख होत आहे. मागील वेळी राम शिंदे मंत्री असताना ते काहीही करू शकत होते. मात्र त्यांनी कर्जत नगरपंचायतीची निवडणूक लोकशाही पद्धतीने लढवत आपली सत्ता आणली होती. सध्याचे आमदारांनी ती दहशत करीत लढवत असल्याचे सांगितले.

Karjat Nagar Panchayat Election

प्रशासन त्यांच्या ताब्यात, मतदारसंघात लोकशाही नाही – सचिन पोटरे

कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत सोमवारी सर्वानाच अचंबित करणारी गोष्ट घडली. आ पवारांच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या उमेदवारांवर दबाव आणत त्यांना थेट निवडणूक अधिकाऱ्यांच्या जवळ नेत उमेदवारी अर्ज माघार घ्यायला लावले. प्रशासनदेखील दुजाभाव करीत असून आमचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही म्हणत जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला.

कर्जत नगरपंचायतीची निवडणूक रद्द करावी – दादासाहेब सोनमाळी

विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीने कर्जतचा बिहार होत असून त्यांच्या दुर्दैवी राजकारणाचा अनुभव कर्जतकर घेत आहे. प्रशासनातील अधिकारी त्यांना शरण गेले आहे. ते अधिकारी नसून राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि गडी असल्याचे चित्र मतदारसंघात आहे. कर्जतकराचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा घणाघाती आरोप दादासाहेब सोनमाळी आपल्या भाषणात केला.