Heat Wave In Akola Maharashtra | महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा कहर, उष्माघाताने घेतला आणखी एका शेतकऱ्याचा बळी !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । जगातल्या सर्वाधिक दहा उष्ण शहरांमध्ये समावेश झालेल्या विदर्भातील अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोल्यात उष्णतेने हाहाकार माजवण्यास सुरूवात केली आहे. या भागात उष्माघाताने एका शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. राज्यात उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या बळींची संख्या आता दोन झाली आहे. (Samadhan Shamrao Shinde dies due to heat wave in Akola Maharashtra)

राज्यासह विदर्भात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतचं चालला आहे. अनेक जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अकोल्यातही तापमान 43 अंशावर गेले आहे. उष्मघातामुळे अकोल्यात समाधान शामराव शिंदे या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शेतातून काम करून घरी परतत असताना शिंदे यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Farmer Samadhan Shamrao Shinde dies due to heat wave in Akola Maharashtra)

अकोल्याच्या (Akola District) तापमानाने रेकॉर्ड ब्रेक केला असून अकोला हे देशातील दुसऱ्या तर जगातील आठव्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे. गेल्या आठवड्या भरापासून अकोल्यात तापमानने उच्चांक गाठला आहे. तापमानाचा पारा 43 अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचला आहे.

अशातच अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील सारकिन्ही या गावातील 50 वर्षीय समाधान शामराव शिंदे हे नित्य नियमाप्रमाणे आपल्या शेतातील काम करण्यास गेले असता शेतात काम करताना समाधान शिंदे हे चक्कर येऊन खाली पडले गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शिंदे यांचा मृत्यू उष्माघातामुळेच झाला असे जाणकारांचे म्हणणे आहे.

जळगावातही उष्माघाताचा बळी

जळगावमधील मांडळ (अंमलनेर) या गावात शेतात काम करत असलेल्या जितेंद्र संजय माळी या शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना चक्कर येऊन कोसळले होते. त्यांना चुलत भाऊ महेंद्र व मजुरांनी खासगी डॉक्टरांकडे दाखल केले. प्रथमोपचार करून जितेंद्र यांना अमळनेरला नेत असताना ते बेशुद्ध पडले होते त्यातच त्यांचा मृत्यु झाला. माळी यांना उष्माघात सदृश्य लक्षणे होती व मेंदूत रक्तस्राव झाला असल्याचे डॉ. आशिष पाटील यांनी सांगितले. (Farmer Jitendra Mali dies due to heat wave in Jalgaon, Maharashtra)

बारामतीत उष्माघाताने तीन शेळ्यांचा मृत्यू

उष्मघातामुळे बारामती तालुक्यात तीन शेळ्या एकाच दिवशी दगावल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील तीन शेतकऱ्यांच्या शेळ्या उष्माघाताने दगावल्या आहेत.यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. उष्मघातामुळे मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे.

उन्हामुळे भर दुपारी एकाच वेळी झारगडवाडी शिवारातील तीन शेळ्या दगावल्याची घटना मंगळवारी घडली. यानंतर शेतकरी गोपीनाथ बोरकर यांनी संबंधित घटनेची पशूसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानंतर अवघ्या काही वेळातच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली होती. या तीन शेळ्यांचा मृत्यू हा उष्मघातानेच झाल्याचे पशूसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शिवाय उर्वरीत शेळ्यांची काळजी घेण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.

जगातील 10 उष्ण शहरात महाराष्ट्रातील दोन शहरं

जागतिक तापमान वाढीचे परिणाम आता जगभरात उमटताना दिसत आहेत. जगभरातील उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. जगातील पहिल्या दहा उष्ण ठिकाणांच्या यादीत महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि अकोला या दोन शहरांचा समावेश झाला आहे. तसेच भारतातील अन्य दोन शहरांचा समावेश आहे. त्यानुसार पहिल्या दहामध्ये भारतातील 4 शहरे सर्वाधिक उष्ण शहरे म्हणून जगाच्या पाठीवर नोंदवले गेले आहेत.

हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाने अगामी चार ते पाच दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याची इशारा दिला आहे. अहमदनगर सह राज्यातील अनेक जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा मोठा प्रभाव असणार आहे. उष्माघातापासून बचावासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे अवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.