- Advertisement -

राम शिंदेंना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी भाजपची फिल्डिंग !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी व आगामी निवडणुकी संदर्भात पक्ष मजबुतीसाठी तसेच कर्जत – जामखेडमधील राजकीय दहशतीला आळा घालण्यासाठी माजी मंत्री तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे यांना विधान परिषदेची संधी द्यावी अशी एकमुखी मागणी अहमदनगर जिल्हा भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.

आगामी मे व जून महिन्यात विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकीत भाजपने माजी मंत्री राम शिंदे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी संघटनात्मक पातळीवर करण्यात आली आहे.

राज्याच्या कोअर कमिटीच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर जिल्ह्याच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता, यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी प्रा.राम शिंदे यांना विधान परिषदेची संधी मिळावी, असा ठराव मांडला होता. या ठरावाही यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आला.

या प्रसंगी दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, जि.प.गटनेते जालिंदर वाकचौरे, जिल्हा संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग, सचिन पोटरे, नितीन दिनकर, सुनिल पवार, अशोक पवार, गणेश पालवे, पप्पू धोदाड,आदिंसह जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक आढावा घेत आगामी निवडणुकी संदर्भात विस्तृत स्वरुपात चर्चा केली. विधानसभा निहाय माहिती घेत जिल्ह्यासाठी स्वतंत्र वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर दक्षिण भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे म्हणाले की, माजी मंत्री प्रा.राम शिंदे हे तालुकाध्यक्ष पदापासून प्रदेश उपाध्यक्ष पदापर्यंत पक्षातील संघटनात्मक कामांमुळे पोहचले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदार संघात पालकमंत्री असतांना सर्वांना न्याय देण्याची भुमिका घेतली होती. जिल्ह्यात भाजपाला गतवैभव मिळवून द्यावयाचे असेल तर राम शिंदे यांना आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत संधी देण्यात यावी.

भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये नव्याने निर्माण झालेल्या ओबीसी खात्याचे मंत्री असतांना राज्यातील ओबीसी व भटक्या समाजाला त्यांनी न्याय मिळावून दिला. राज्य पातळीवर प्रतिष्ठेची समजली जाणारी कोअर कमिटी सदस्यपदी निवड झाल्यामुळे राम शिंदे यांचा संघटनेने सन्मानच केला आहे. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यात पक्ष बळकटीसाठी त्यांना संधी मिळावी, अशी अहमदनगर जिल्हा भाजपच्या वतीने  मागणी करत असल्याचे सचिन पोटरे यांनी सांगितले.