जवळा : ऊसतोड कामगाराने इतिहास घडवला, माजी सभापतीच्या पुत्राचा केला दारूण पराभव

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । निवडणूक आली रे आली की, त्यात दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या असतात, अशीच एक प्रतिष्ठेची निवडणूक जामखेड तालुक्यात नुकतीच पार पडली.या निवडणुकीत ऊसतोड कामगाराने माजी सभापती असलेल्या बड्या नेत्याच्या पुत्राला अस्मान दाखवत दिमाखदार विजय मिळवला. त्यामुळे ही निवडणुक तालुक्यात चर्चेची ठरली आहे.

जामखेड तालुक्यातील जवळा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शेतकरी विकास आघाडीने सर्व जागां जिंकत जवळा सोसायटीवर कब्जा मिळवला.या निकालात शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार रूपचंद आव्हाड यांनी मिळवलेला विजय तालुक्यात चर्चेत आला आहे.

जवळा सोसायटीच्या निवडणुकीत अनुसूचित जाती जमाती या मतदारसंघातून जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष आव्हाड यांचे सुपुत्र सुशिल आव्हाड हे रिंगणात होते, त्यांच्याविरोधात ऊसतोड कामगार असलेले रूपचंद तुकाराम आव्हाड हे उभे होते, राजकीयदृष्ट्या मातब्बर असलेले सुशिल आव्हाड हे रूपचंद आव्हाड यांचा सहज पराभव करतील अशी स्थानिक वर्तुळात चर्चा रंगली होती. परंतू निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

जवळा सोसायटी निवडणूकीत शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार रूपचंद तुकाराम आव्हाड यांनी शेतकरी ग्रामविकास पॅनलचे उमेदवार सुशिल आव्हाड यांचा तब्बल 207 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत रूपचंद आव्हाड यांना 846 मते मिळाली तर सुशिल आव्हाड यांना 639 मते मिळाली. जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष आव्हाड यांच्या पुत्राचा दारूण पराभव करत रूपचंद आव्हाड हे या निवडणुकीत ‘जायंट किलर’ ठरले आहेत.

शेतकरी विकास आघाडीकडून निवडून आलेल्या सर्व उमेदवारांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक 846 मते घेऊन रूपचंद आव्हाड यांनी दिमाखदार विजय संपादन केला. अर्ज मागे घ्या म्हणून विरोधकांकडून अनेक प्रलोभने दाखवली गेली होती, परंतू त्याला बळी न पडता उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, शेतकरी विकास आघाडीशी एकनिष्ठ राहिलो आणि जिंकलो असे रूपचंद आव्हाड जामखेड टाईम्सशी बोलताना म्हणाले.

आव्हाड यांनी मिळवलेल्या दणदणीत विजय प्रस्थापित राजकारण्यांसाठी एक वेगळाच धडा शिकवणारा ठरला आहे, अशी चर्चा आता जामखेड तालुक्यात रंगली आहे.