- Advertisement -

Godrej Group of Companies । 124 वर्षे जुन्या ‘गोदरेज’ उद्योग समुहाची होणार वाटणी, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : Godrej Group of Companies । देशातील सर्वात जुन्या उद्योगसमूहांपैकी एक असलेल्या गोदरेजचे (Godrej) साम्राज्य लवकरच विभागले जाणार आहे. या समूहाकडे तब्बल 4.1अब्ज डॉलर्सची संपत्ती असून त्याच्या कायदेशीर वाटणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या माहितीनुसार, गोदरेज समूहाची (Godrej Industries Group) संपत्ती गोदरेज कुटुंबातील दोन गटांमध्ये वाटली जाणार आहे. यापैकी पहिला गट आदि गोदरेज आणि त्यांचे बंधू नादिर गोदरेज यांचा आहे. तर दुसऱ्या गटात जमशेद गोदरेज आणि स्मिता गोदरेज कृष्णा यांचा समावेश आहे. (The 124-year-old Godrej Group of Companies will be allotted)

समूहाचा व्यवसाय ग्राहकोपयोगी वस्तूंपासून रिअल इस्टेट आणि इंजिनीअरिंगमध्ये बदलण्याबाबत काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. आदि गोदरेज यांचे पूत्र फिरोजशहा गोदरेज यांच्याकडे सूत्र आल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला आहे. जमशेद दुसर्‍या बाजूचे प्रतिनिधित्व करत आहेत, त्यांच्यासोबत गोदरेज अँड बॉयसचे मुख्य आर्थिक अधिकारी पुर्वेझ केसरी गांधी आहेत. कुटुंबाच्या जवळच्या बँकर्सचाही सल्ला घेतला जात आहे. यामध्ये निमेश कंपाणी, उदय कोटक यांचा समावेश आहे. यासोबतच AZB & Partners च्या जिया मोदी आणि सायरल श्रॉफ यांच्यासारख्या कायदेतज्ज्ञांशीही सल्लामसलत केली जात आहे.

गोदरेज इंडस्ट्रीज आणि गोदरेज अँड बॉयस यांनी ET ला एका संयुक्त निवेदनात सांगितले की, गोदरेज कुटुंब आपल्या भागधारकांसाठी सर्वोत्तम मूल्य सुनिश्चित करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून दीर्घकालीन धोरणात्मक योजनेवर काम करत आहे. प्रक्रियेचा एक भाग म्हणून त्याने बाहेरील सहकाऱ्यांकडूनही सल्ला मागितला आहे. येत्या सहा महिन्यांत काही निष्कर्ष निघणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

124 वर्ष जुन्या असलेल्या गोदरेज समूहाची मुहूर्तमेढ टाळे तयार करण्याच्या कारखान्यापासून रोवली गेली. नंतरच्या काळात गोदरेजनेजगातील पहिला वनस्पती तेलाचा साबण बनवला. हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित गटांपैकी एक आहे. कुटुंबाची चौथी पिढी आता या व्यवसायात गुंतली आहे. आदि गोदरेज यांच्या जवळचे लोक म्हणतात की ते सध्याच्या परिस्थितीवर खूश आहेत, परंतु नवीन पिढीला मालकीबद्दल स्पष्ट चित्र हवे आहे.

गोदरेज आणि बॉयस व्यतिरिक्त, उर्वरित सूचीबद्ध संस्था – GIL, GCPL, गोदरेज प्रॉपर्टीज आणि गोदरेज अॅग्रोव्हेट या सर्व कंपन्यांचे नियंत्रण आदि आणि नादिर गोदरेज यांच्याकडे आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकमेकांच्या कंपनीत स्वतःचे शेअर्स आहेत आणि मंडळावर त्यांचे प्रतिनिधित्वही आहे.

हे पाऊल उचलण्यापूर्वी आदि गोदरेज GIL च्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले होते. या महिन्यात त्यांची जागा नादिर गोदरेज यांनी घेतली, जे व्यवस्थापकीय संचालक होते. गेल्या काही वर्षांत आदि गोदरेज यांनी त्यांच्या वेगवेगळ्या ग्रुप बिझनेसची जबाबदारी त्यांच्या तीन मुलांवर दिली होती. मुलगा फिरोजशहा गोदरेज गोदरेज प्रॉपर्टीजचा अध्यक्ष झाला. मोठी मुलगी तान्या दुबाश ग्रुपची कार्यकारी संचालक आणि मुख्य ब्रँड अधिकारी बनली. तर, सर्वात धाकटी मुलगी निसाबा गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडची (GCPL) अध्यक्ष म्हणून 2017 पासून कार्यरत आहे.