पिंपरखेड दरोड्यातील पाच दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !  

पुणे :  पिंपरखेड येथील बँक दरोड्याचा छडा लावण्यात पुणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी मुख्यसूत्रधारासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.यातील तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. अतिशय नियोजनपूर्वक हा दरोडा आरोपींची टाकला होता. भरदिवसा हा दरोडा पडल्यामुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती

डॉलर ऊर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ, ( रा वाळद, ता. खेड), अंकुर महादेव पाबळे (रा कावळपिंपरी, ता. जुन्नर), धोंडीबा महादु जाधव (रा. निघोज कुंड, ता. पारनेर, जि. अ.नगर), आदिनाथ मच्छिंद्र पठारे, (रा. पठारवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), विकास सुरेश गुंजाळ,( रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार  शिरूर पोलिस तक्रार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सदरचा गुन्हा डॉलर ऊर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ याने त्याच्या साथीदारासह केला असल्याची माहीती खबऱ्याच्या माध्यमातून मिळाली होती.

त्यानुसार आरोपींचा शोध घेत असताना डाॅलर हा गुन्हा केल्यानंतर मध्यप्रदेशमध्ये गेल्याची माहीती प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक मध्यप्रदेश येथे रवाना झाले होते. सदर आरोपी हा अहमदनगर जिल्ह्यातील निघोज, ता. पारनेर येथे येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीस निघोज येथून ताब्यात घेतले.त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने इतर चार साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याची कबुली दिली.