जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 20 ऑक्टोबर 2022 । जामखेड तालुक्यातील दिघोळमध्ये आज वादळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटसह झालेल्या पावसात वीज कोसळण्याचा घटना घडली आहे. या घटनेत 18 वर्षीय मुलाच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत अकरावीत शिक्षण घेत असलेला मुलगा जखमी झाला आहे. त्याच्यावर जामखेडच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी पाऊस पडत आहे. धो धो कोसळणाऱ्या पावसात विजांचा कडकडाट होत आहे. आज सायंकाळी जामखेड तालुक्यातील दिघोळ परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली.आपल्या आई वडिलांसह शेतात गेलेल्या विकास राजेंद्र अटकरे या 18 वर्षीय मुलावर वीज कोसळण्याची घटना घडली.
या घटनेत तो जखमी झाला आहे. त्याच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ही घटना दिघोळ – खर्डा मार्गावरील एका टेकडीवर घडली. जखमी विकास हा अकरावीच्या वर्गात शिकत आहे.

जखमी विकास अटकरे हा आपल्या आई वडील आणि चुलत्यांसह शेतात गेला होता. चारच्या सुमारास पावसास सुरुवात झाल्याने तो चिंचेच्या झाडाखाली थांबला होता. त्याचवेळी वीज कोसळण्याची घटना घडली.
या घटनेत विकास याच्या पाठीला आणि पायाला जखम झाली. तसेच विकासचा मोबाईल जळून खाक झाला. दैव बलवत्तर म्हणून या घटनेतून विकास थोडक्यात बचावला.
दरम्यान, घटनेनंतर जखमी विकास याला उपचारासाठा तातडीने जामखेडच्या ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डाॅ कुंडलिक अवसरे यांनी दिली.