जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । कुकडी जेव्हापासून कर्जत तालुक्यात आली तेव्हापासून येसवडी पाझर तलाव कुकडीच्या पाण्याने भरला पाहिजे अशी प्रतिक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा आज संपली. तलाव पुर्ण क्षमतेने भरलाय.येसवडीकरांचे वीस – पंचवीस वर्षांचे स्वप्न पुर्ण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन आमदार प्रा राम शिंदे यांनी केले.
कुकडी प्रकल्पातील ओव्हर प्लोच्या पाण्यातून गेल्या काही दिवसांपासून कर्जत तालुक्यातील लहान मोठे तलाव भरून घेतले जात आहे. यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत कुकडीचे कार्यकारी अभियंता एस व्ही काळे यांच्या हस्ते कर्जत तालुक्यातील येसवडी पाझर तलावाचे शुक्रवारी 26 रोजी जलपुजन करण्यात आले. यावेळी सचिन पोटरे ,पप्पू शेठ धोदाड , सुनील गावडे , तात्या माने ,शोएब काझी , शांतीलाल कोपनर , बप्पू धोंडे , बंडा मोढळे सह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद
यावेळी पुढे बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, 2019 पूर्वी माझ्याकडून येसवडीचा तलाव भरायचा राहून गेला होता. परंतू लोकांना वाटलं की मागच्या तीन वर्षांत तरी भरला जाईल, पण अपेक्षा काही पुर्ण झाली नाही. मी पुन्हा आलो. आणि हा पाझर तलाव भरून दिला. त्याचे आज जलपुजन संपन्न झाले. येथील नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा आहे, असेही आमदार राम शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
आमदार रोहित पवारांवर निशाणा
आता मला फोन करायची गरज नाही एव्हढं पाणी सोडलयं असे सांगत शिंदे म्हणाले की, आपुन शेतकरीयेत, विहिरीला, बोअरला पाणी नसल्यावर ऊसाची सरी काढतोत का ? मग पाऊस पडेल असं जर इतकं माहित असतं, त तीन वर्षांत एकदा तरी पाणी आलं असतं ना ? खोटं बोलण्याचा, वाॅट्सअप, फेसबुक चालवण्याचा कहर झाला, प्रत्यक्षात लोकांपर्यंत काहीच पोहचलं नाही,असे सांगत शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
शिंदे -फडणवीस सरकारने न्याय दिला
येसवडी पाझर तलावात पाणी यावं यासाठी अनेकवेळा अंदोलन झाले, अनेक वेळा मागण्याही झाल्या, पण येसवडी हे कुकडीच्या टेलला असल्यामुळं आपल्यापर्यंत ओघूळ यायचा आणि तो टेकला की पाणी बंद व्हायचं, गेल्या 20 – 25 वर्षांपासून पाण्याची प्रतिक्षा होती. करमनवाडी आणि येसवडी हे तलाव यंदा पुर्ण क्षमते भरले. सरकारने न्याय दिला असे शिंदे म्हणाले.
मी बी आलो आणि सरकार बी आलं
ज्याच्यासाठी मला तुम्ही काम दावलं, तुम्ही म्हंजी सगळ्यांनीच नाय दावलं, तीन वर्षांत येसवडीकर तर नाहीच कर्जत तालुक्याला नीटनेटकं पाणी नाही आलं. पण हरकत नाही, मी पण काही कमी नाही, मी मध्येच अडीच वर्षे झालं की आलो, मी बी आलो आणि सरकार बी आलं, शिंदे – फडणवीस सरकार येताच या भागात पाणी सोडलं, पुर्ण क्षमतेने पाणी पोहचलं की नाही हे पाहायला आज येसवडीत आलो असे शिंदे म्हणाले.