गुरुवारी सायंकाळी चूंबळीच्या ओढ्याला पूर आल्याने वाहतूक झाली होती ठप्प,चूंबळी पूल ठरतोय वाहतुकीसाठी धोकादायक; पुलाची उंची वाढवण्याची गरज !

जामखेड करमाळा रस्त्यावर सुमारे दीड तास वाहतूक झाली होती बंद. 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात गुरुवारी सायंकाळी काही भागांना मुसळधार पावसाने झोडपले. अनेक भागातील रस्त्यांवरील ओढ्यांना पुर (flooding) सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने घरी परतणाऱ्या अनेक प्रवाश्यांचे मोठे हाल झाले. जामखेड करमाळा रस्त्यावर सुमारे दीड तास वाहतूक बंद झाली होती. (Traffic was jammed due to flooding of Chumbali stream on Thursday evening, Chumbali bridge is becoming dangerous for traffic; Need to increase the height of the bridge)

जामखेड करमाळा रस्त्यावर असलेल्या चुंबळी गावाजवळ असलेल्या ओढ्याला पूर आल्याने जामखेड करमाळा रस्त्यावर सुमारे दीड तास वाहतूक बंद झाली होती. सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे ओढ्याला मोठा पूर आला होता. गेल्या दोन तीन दिवसांपासून या भागात मोठा पाऊस पडत असल्याने ओढ्याला पूर येत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

जामखेड करमाळा रस्त्यावरील चुंबळी गावाजवळ असलेल्या ओढ्यावरील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात या ओढ्याला सातत्याने पूर येतो यामुळे या मार्गावरची वाहतूक सतत ठप्प होत असते. सदर ओढ्याला तीव्र उतार असल्याने पाण्याला मोठा वेग असतो. पुलावर पाणी असताना त्यावर प्रवास करणे मोठे धोकादायक ठरते , परंतु गुरुवारी सायंकाळी सदर पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी असतानाही दुचाकीस्वार पाण्यात गाड्या घालून प्रवास करताना दिसत होते. हा धोकादायक प्रवास जीवघेणा ठरू शकतो. मोठी वाहनेही पुलावर पाणी असताना ये ja करत होती . तसेच काही नागरिक सुद्धा पाण्यातून चालत असल्याचे दृध्य दिसत होते.

चुंबळी गावाजवळ असलेल्या ओढ्यावर सातत्याने निर्माण होत असलेली पुरसदृश्य मोठी धोकादायक आहे. येथील पुलाची उंची वाढवणे आवश्यक आहे  अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व वाहनधारक करताना दिसत आहेत.

दरम्यान रात्री साडे आठ नंतर या पुलावरील पाणी कमी झाल्यानंतर वाहतुक सुरु झाली होती परंतु पुलावर अजूनही एक ते दीड फुट पाणी वाहत होते. रात्री पुन्हा पाऊस झाल्यास या पुलावर पाणी  येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जामखेड करमाळा मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी चुंबळी येथील पुलावरील पाण्याची परिस्थिती पाहूनच प्रवास करावा.

पहा संपूर्ण व्हिडीओ :चुंबळी येथील पुलावर गुरुवारी सायंकाळी निर्माण झालेल्या पूर सदृश्य परिस्थितीत जीव धोक्यात घालून प्रवास करणारे नागरिक