जामखेड : विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे विचार अंगीकारावेत- डॉ. गोरक्ष ससाणे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र ही थोर संतांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे. या भूमीत जन्मलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजही प्रेरणादायी अन् ऊर्जादायी आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आपल्या जीवनात अंगीकार करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा, असे अवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगाव येथे ३१ मे, २०२३ रोजी अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डाॅ ससाणे बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. चारुदत्त चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पोपट पवार, विद्यार्थी प्रतिनिधी अश्रफअली शेख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अहिल्यादेवींच्या कार्यगौरवाचा पोवाडा सादर केला. तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी सुशांत बिराजदार, अंगद लाटे, प्रजाली गोसावी, समीक्षा वाघ, गांधाली कुलकर्णी, सृष्टी काळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अर्चना महाजन यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी समाजासाठी केलेल्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी अहिल्यादेवी होळकर यांचे गुण आपल्या आचरणात आणावेत असे अवाहन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थीनी अंजली पाटील हिने केले तर महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे चेअरमन अश्रफ अली शेख यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम पार पडला.