खळबळजनक : गोळीबाराच्या घटनेने अहमदनगर जिल्हा हादरला; राहुरी तालुक्यात एकाचा मृत्यू

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Pradip Pagire murder case | गोळीबाराच्या घटनेने सोमवारी अहमदनगर जिल्हा हादरला, या घटनेत एकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, राहुरी तालुक्यात गावठी पिस्तुलांचे पेव फुटले आहे. ही गावठी पिस्तुले आता टेलर दुकानातही जाऊन पोचली आहेत. या गावठी पिस्तुलामुळे आज राहुरी तालुक्यात एका तरुणाचा जीव गेला आहे.

गुंजाळे (ता. राहुरी) येथे आज (सोमवारी) सकाळी नऊ वाजता भरचौकातील एका टेलरच्या दुकानात गावठी पिस्तुलातून गोळीबार झाला. एका अविवाहित तरुणाच्या छातीत गोळी घुसली. आसपासच्या ग्रामस्थांनी व कुटुंबीयांनी दुकानात धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला तात्काळ नगर येथे खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. परंतु, उपचारापूर्वी तरुण ठार झाला होता.

प्रदीप एकनाथ पागिरे (वय 25, रा. गुंजाळे) असे मृताचे नाव आहे. तो टेलरिंग व्यवसाय करीत होता. या घटनेमुळे तालुक्यात गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट झाल्याचे अधोरेखित झाले आहे. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.

पोलिस उपअधीक्षक मिटके यांनी सांगितले की, आज सकाळी नऊ वाजता प्रदीप एकटाच दुकानात होता. त्याची आई व त्याचा अक्षय नवले (रा. गुंजाळे) नावाचा एक मित्र दुकानाच्या बाहेर बोलत होते. एवढ्यात दुकानातून गोळीबार झाल्याचा आवाज आला. सर्वजण दुकानात धावले. प्रदीप रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मित्र अक्षयने त्याला नगर येथे खासगी रुग्णालयात हलविले. परंतु, उपचारापूर्वी त्याचे निधन झाले होते.

प्राथमिक चौकशीत प्रदीप पागिरे याने गावठी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे, सुरवातीला राहुरी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताच्या उत्तरीय तपासणीचा अहवालात व पोलिस तपासात मृताने आत्महत्या केली की खून झाला याविषयी स्पष्टता समोर येईल. त्यानुसार गुन्ह्यातील कलमे वाढविली जातील.

घटनेत वापरलेली गावठी पिस्तूल कोणाची आहे. ती कोणाकडून खरेदी केली आहे. ती कोणत्या उद्देशाने खरेदी केली. आत्महत्या असल्यास नेमके कारण कोणते. याविषयी सविस्तर पोलीस तपास केला जाईल. असेही पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले.