संतापजनक : साईबाबांच्या शिर्डीत वासनांध शिक्षकांचे विद्यार्थ्यीनींसोबत अश्लील चाळे, संतप्त पालकांनी मास्तरांना धु – धु धुतले
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । साईबाबांच्या शिर्डीतून गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेत शिक्षकच अल्पवयीन विद्यार्थीनींना अश्लील व्हिडीओ दाखवत त्यांच्याशी गैरवर्तन करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे शिर्डीसह राज्यभरात त्या वासनांध मास्तरांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या पालकांनी वासनांध मास्तरांना बेदम चोप दिला आहे. या घटनेमुळे शिर्डी पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आली आहे.
शिर्डीतील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 7 वी व 8 वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनेक अल्पवयीन विद्यार्थीनींना मोबाईलवरून अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून शाळेतील दोघा शिक्षकांकडून सुरु होता. या प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर पालकवर्गात संतापाची लाट उसळली आहे. पालकांनी त्या शिक्षकांना बदडून काढले आहे. त्या शिक्षकांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिर्डीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीने नराधम शिक्षकांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.सदर मुलीसह अन्य १० ते १२ अल्पवयीन मुलीसुद्धा त्या शिक्षकांच्या शिकार झाल्या आहेत.हे शिक्षक मुलींना मोबाईलवरून अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करीत होते,असे मुलीने पोलिसांना सांगितले. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. मात्र, हे शिक्षक मुलींना तुम्ही याची वाच्यता कुठे केल्यास तुमचा दाखला रद्द करण्याची धमकी देत होते.
गरीब कुटुंबातील मुली भीतीपोटी हा प्रकार सहन करीत होत्या. तर एका मुलीने शाळेत जाणेच सोडले. तिचे शाळेत न जाण्याचे कारण जेव्हा तिच्या आईने विचारले तेव्हा या मुलीने रडत रडत सर्व हकीगत आईला सांगितली. मुलीच्या आईने ह्या गंभीर प्रकाराची माहिती इतर पालकांना सांगितली तेव्हा अनेक पालकांनी आपल्या मुलींना विश्वासात घेत विचारणा केली, अनेक मुलींनी हे शिक्षक आम्हाला अश्लील फोटो दाखवत होते, असे सांगितल्याने हा प्रकार समोर आला.
त्यानंतर पालकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी थेट शाळेत जाऊन ह्या शिक्षकांना जाब विचारला मात्र त्यांंचे उद्धट बोलणे आणि खोटं सोंग घेणे हे सर्वांच्या लक्षात आल्यावर पालकांनी शिक्षकांंना चांगलाच चोप दिला.दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी पोस्को कायद्या अंतर्गत भा.द.वि.कलम ८ व १२ यासह अनुसूचित जाती जमाती कायदा अंतर्गत कलम ३ (१) (w) (i) ( ii ) ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील आरोपी संजय सखाहरी थोरात आणि राजेंद्र माधव थोरात या दोन्ही शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. याचबरोबर इतर अल्पवयीन मुलींचे जबाब नोंदवून आणखी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली.