सासरा आणि सुनेची कर्जत नगरपंचायतीत दमदार एन्ट्री, नामदेव राऊतांचे राजकीय वजन वाढले !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | अफरोज पठाण |  कर्जत नगरपंचायत निवडणुकीत चक्क सासरा आणि सुनेने दुसर्‍यांदा दिमाखदार विजय मिळवत दमदार एन्ट्री केली आहे. कर्जत नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव (देवा) राऊत आणि त्यांची सून उषा अक्षय राऊत हे दोघे पुन्हा एकदा कर्जत नगरपंचायतीमध्ये विराजमान होणार आहेत. दोघांनी दमदार विजय संपादन केला आहे. दोघेही दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. (Namdev (Deva) Raut, Usha Akshay Raut’s strong victory in Karjat Nagar Panchayat election)

उषा राऊत यांनी विक्रमी मताधिक्य घेत तब्बल ५३० मतांनी भाजपाच्या मोनिका गदादे यांचा दारूण पराभव केला. तर त्यांचे सासरे आणि कर्जतच्या स्थानिक राजकारणातील किंगमेकर नामदेव (देवा) राऊत यांनी शहाजीनगर प्रभागातून त्यांचेच शिष्य असणारे शरद मेहत्रे यांचा ३२३ मतांनी पराभव केला. 

विशेष म्हणजे नामदेव राऊत यांनी आपला हक्काचा प्रभाग यंदा सुनेसाठी सोडत त्यांनी शहाजीनगर या प्रभागातून निवडणूक लढवली होती. सुनेसह सासऱ्याने यंदाही मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत स्थानिक राजकारणात आपणच किंगमेकर असल्याचे यानिमित्त दाखवून दिले आहे.

कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या सूनबाई उषा राऊत ह्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत अक्काबाई नगर प्रभागातून निवडून आल्या होत्या. यंदा त्यांनी नामदेव राऊत यांच्या हक्काच्या प्रभागातून उमेदवारी करत विजय संपादन केला.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत नामदेव राऊत यांना धोका होणार अशी चर्चा रंगली होती. राऊत यांना खिंडीत पकडण्याचे मनसुबे भाजपाकडून आखण्यात आले होते. परंतू राऊत यांनी आपली राजकीय ताकद व अनूभव पणाला लावत केलेली तटबंदी भाजपला भेदता आली नाही. राऊत यांनी पुन्हा एकदा दिमाखात नगरपंचायतीत प्रवेश करत शहराच्या राजकारणात आपणच किंगमेकर आहोत हेच अधोरेखित केले हाच या निकालाचा अर्थ आहे असेच राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या आधी नामदेव राऊत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राऊत यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपला मोठे भगदाड पडले होते. राऊत यांचा निवडणुकीआधी झालेला प्रवेश निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा देणारा ठरणार का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर कर्जत नगरपंचायतचे निकाल समोर आले आणि राष्ट्रवादी व काँग्रेसने नगरपंचायतवर झेंडा फडकावला. भाजपला सत्तेतून पाय उतार करण्यात राऊत यांची भूमिका महत्वाची ठरली.

कर्जत नगरपंचायत आपल्या ताब्यात यावी याकरिता राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने आ रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील जोरदार मोर्चेबांधणी केली. प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांना साथीला घेत आमदार रोहित पवार यांनी भाजपला चारीमुंड्या चित केले. आजच्या निकालाने नामदेव राऊत यांचे राष्ट्रवादीतील राजकीय वजन मात्र वाढले आहे.