जामखेड | भाजीपाला विक्रीस निघालेल्या शेतकऱ्यावर काळाची झडप, अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी जागीच ठार

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । भाजीपाला विक्रीस निघालेल्या शेतकऱ्यास अज्ञात वाहनाने चिरडण्याची दुर्दैवी घटना आज उघडकीस आली आहे. या घटनेत शिऊरच्या बसरवाडी येथील शेतकऱ्याचा जागीची मृत्यू झाला आहे. या घटनेने बसरवाडी परिसरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Jamkhed basarwadi farmer was killed on the spot when an unknown vehicle hit him while he was going to sell vegetables

याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील बसरवाडी येथील शेतकरी परमेश्वर प्रभाकर पिंपरे हे आज सकाळी आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला विक्रीसाठी जामखेडला घेऊन चालले होते. त्यांची मोटारसायकल जामखेड- खर्डा रस्त्यावरील मारूती मंदिर परिसरात येताच एका अज्ञात वाहनाने त्यांची मोटारसायकलला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात परमेश्वर प्रभाकर पिंपरे हे गंभीर जखमी झाले होते.

दरम्यान अपघाताची घटना घडताच स्थानिकांनी जखमी पिंपरे यांना उपचारासाठी तातडीने जामखेड ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीच पिंपरे यांचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिक्षक युवराज खराडे यांनी वैद्यकीय तपासणी करून पिंपरे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान अपघाताची घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर पोलिसांनी सदर घटनेची माहिती नातेवाईकांना कळवली. शेतकऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाच्या शोधासाठी जामखेड पोलिसांनी वेगाने तपास हाती घेतला आहे.

भाजीपाला विक्रीसाठी जामखेडला निघालेल्या बसरवाडी येथील शेतकऱ्याच्या अपघाती निधनामुळे संपुर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.